दहिगाव रेचा येथे २० मार्चला भव्य ‘गाळबगाळ’ सोहळा;
अंजनगाव सुर्जी/ तालुका प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा येथील प्राचीन व जागृत आई जगदंबा देवीच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव आणि यात्रा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. फाल्गुन–चैत्र शुक्ल पक्षात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी, दि. २० मार्च २०२६ रोजी पारंपरिक ‘गाळबगाळ’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याकडे संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.या उत्सवातील सर्वांत आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे जगदंबा देवी संस्थानचे पुजारी ह.भ.प. भानुदास महाराज काळमेघ यांचे सुपुत्र ह.भ.प. श्री. शंकर काळमेघ यांचा अद्वितीय पराक्रम. दरवर्षीप्रमाणे यंदाही शंकर काळमेघ हे एकाच वेळी लोकांनी भरलेल्या सात बैलगाड्या ओढून गाळबगाळ परंपरा साकार करणार आहेत. शारीरिक ताकद, श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेला हा सोहळा पाहण्यासाठी तालुक्यासह आसपासच्या गावांमधून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.गाळबगाळ ही बैलगाड्या ओढण्याची अत्यंत दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण परंपरा मानली जाते. या परंपरेचे जतन करण्यामध्ये शंकर काळमेघ यांचे योगदान विशेष मानले जाते. वर्षानुवर्षे सात बैलबंड्या ओढण्याची जबाबदारी ते श्रद्धेने पार पाडत असून या पराक्रमामुळे त्यांचे नाव पंचक्रोशीत विशेष आदराने घेतले जाते.गाळबगाळ सोहळ्याची मिरवणूक विलास भगत यांच्या घरापासून प्रारंभ होऊन चावडी चौक, गाईचे गौठान मार्गे देवीच्या मंदिरापर्यंत निघते. या मार्गावर भाविकांची मोठी गर्दी होत असून भक्तिगीत, जयघोष आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात वातावरण भक्तिमय बनते.यात्रा महोत्सवाची पुढील सांगता गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच दि. २१ मार्च रोजी होणार आहे. त्या दिवशी सकाळी गावातून आई जगदंबा देवीची पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. त्यानंतर शंकरराव रेचे यांच्या घरातून राधा–कृष्णांची भव्य मिरवणूक निघेल. ही मिरवणूक भुषण रेचे यांच्या घरी भोजनानंतर देवीच्या मंदिरात पोहोचणार आहे.मंदिरात पारंपरिक नवनिर्माण ढोलाच्या गजरात धार्मिक कार्यक्रम पार पडतील. यामध्ये ह.भ.प. साहेबराव भगत, ह.भ.प. अनंतराव मानकर व त्यांच्या साथ-संगत मंडळाकडून काल्याचे कीर्तन सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर दहीहंडी उत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.या भव्य यात्रा महोत्सवासाठी जगदंबा देवी उत्सव समितीकडून व्यापक तयारी करण्यात येत असून गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. विशेषतः शंकर काळमेघ यांच्या गाळबगाळ पराक्रमाचा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक उपस्थित राहतात. यंदाही पंचक्रोशीतील सर्व भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या परंपरेचा आनंद घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावकरी, जगदंबा देवी उत्सव समिती तसेच छत्रपती ग्रुप, दहिगाव रेचा यांचे सहकार्य लाभत आहे.
