पत्रकारांच्या कल्याणासाठी बाळशास्त्री जांभेकर योजनेची व्याप्ती वाढविण्याची विधानपरिषदेतून सुचना..
महाराष्ट्र असंघटित सामाजिक सुरक्षा मंडळाच्या अधिनस्त पत्रकारांनाही विविध लाभ देऊ – सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार..
मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यातील प्रसारमाध्यमातील पत्रकार, व्यक्ती व कर्मचाऱ्यांच्या कल्याण व सुरक्षेच्या दृष्टीने शासनाकडून प्रभावी उपाययोजना व अंमलबजावणी होण्यासंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य आ.संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळातून महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला, हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरला आहे.त्यामुळे या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी,यासाठी शासनाने ठोस पाऊले उचलण्याची गरज असल्याची लक्षवेधी सुचना आ.संजय खोडके यांनी सभागृहात सादर केली.

राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होत असतांना आ. संजय खोडके यांनी सभागृहाला अवगत केले कि, शासनाने पत्रकारांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू केली आहे. मात्र या संदर्भात शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाकडे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. यासंदर्भात अजूनही अर्जाची पडताळणी झाली नाही तसेच मागील दीड वर्षापासून अधिस्वीकृती समितीची बैठक झाली नसल्याने शेकडो जेष्ठ पत्रकार हे आर्थिक साहाय्य मिळण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेची प्रकरणे निकाली काढण्यासाठी शासनाने संबधित विभागाला सुचना करावी, अशी लक्षवेधी आ.संजय खोडके यांनी लावून धरली. तसेच सदर योजनेसाठी पात्र निकषांमध्ये वयाची अट ६० वर्ष ऐवजी ५८ वर्ष लागू करण्याची सुचना यावेळी सभागृहासमक्ष करण्यात आली.

तसेच प्रसार माध्यमात आपली कर्तव्ये पार पाडत असतांना पत्रकारांवर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी शासनाने लागू केलेल्या पत्रकार सुरक्षा कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासनाने गृह विभागाला वेळोवेळी आवश्यक सूचना व दिशानिर्देश देण्याची आवश्यकता असल्याचे सुद्धा आ. संजय खोडके यांनी सभागृहात बोलतांना सांगितले.पत्रकार कल्याण निधी अंतर्गत पत्रकारांना आरोग्य सुविधा व विमा कवच देणाऱ्या योजनांची व्याप्ती वाढविण्याची आवश्यकता असून त्यामध्ये काही जटिल आजारांचा सुद्धा समावेश करून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना लाभ देण्याची लक्षवेधी सुचना आ. संजय खोडके यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहात लावून धरली.यावर उत्तर देतांना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.आशिष शेलार यांनी सांगितले कि, जेष्ठ पत्रकारांना उतार वयामध्ये आधार व अर्थसाहाय्य म्हणून शासनाच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने अंतर्गत रु. ११,०००/- हजार दरमहा इतके अर्थसहाय्य देण्यात येते. त्यामध्ये वाढ करून २०,००० हजार दरमहा देण्याबात निर्णय घेण्यात येत आहे. यासाठी १८० जेष्ठ पत्रकार पात्र असून सतत ३० वर्ष पत्रकार म्हणून काम करणारे व ६० वर्ष वय पूर्ण असे अशा जेष्ठ पत्रकारांना हि पेन्शन दिली जात असल्याचे मंत्री ना. आशिष शेलार म्हणाले. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांची पडताळणी कारण्यासंदर्भात अधिस्वीकृती समितीला निर्देशित करण्यात येणार आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायद्यांच्या प्रभावी व ठोस अंमलबजावणी संदर्भात गृह विभागाशी चर्चा करून पुढील कार्यवाही करू असे उत्तर सुद्धा ना. शेलार यांनी सभागृहासमक्ष दिले.पत्रकार व त्यांच्या कुटूंबाच्या कल्याणाच्या बाबतीत केंद्र शासनाच्या सामाजिक सुरक्षा संहिता २०२० च्या अधिनस्त राहून शासनाच्या वतीने महाराष्ट्र असंघटित सामाजिक सुरक्षा मंडळाच्यावतीने ज्या काही बेनिफिशियल लाभ आहेत, याचा पत्रकारांनी लाभ होण्यासाठी यामध्ये अंतर्भाव करण्यात आला असल्याचे उत्तर मंत्री ना. शेलार यांनी दिले.
