तहसील कार्यालयामार्फत विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी.
नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे तहसीलदार यांनी केले आवाहन
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
तहसील कार्यालय,नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले असून विविध शासकीय सेवा व तक्रार निवारणासाठी हे शिबिर नागरिकांसाठी मोठी संधी ठरणार आहे. या शिबिरामध्ये महसूल व इतर विभागांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे, दाखले, अर्ज, दुरुस्ती तसेच शासकीय योजनांचा लाभ याबाबत मार्गदर्शन व तत्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.

तहसीलदार अश्विनी जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार शिबिराचे आयोजन खालील दिनांक व ठिकाणी करण्यात आले आहे
दिनांक 7 मार्च 2026 – दाभा लोणी ( टाकळी)
दिनांक 14 मार्च 2026 – माहुली (चोर) व धानोरा (गुरव)
दिनांक 10 एप्रिल 2026 – पापळ
दिनांक 17 एप्रिल 2026 – मंगरूळ-चव्हाळा
दिनांक 8 मे 2026 – नांदगाव खंडेश्वर
दिनांक 15 मे 2026 – शिवनी रसुलापुर या प्रमाणे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरांमध्ये जमीन अभिलेख अद्ययावत करणे, 7/12 उताऱ्यातील दुरुस्ती, विविध दाखले वितरण, नाव नोंदणी, ई-पीक नोंदणी, प्रधानमंत्री किसान योजनेसंबंधी नोंदणी, तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.तहसीलदार अश्विनी जाधव यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित दिनांक व ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. या उपक्रमामुळे नागरिकांच्या समस्या स्थानिक पातळीवर तात्काळ सोडविण्यास मदत होणार असून प्रशासन जनतेच्या सेवेस तत्पर असल्याचे तहसीलदार अश्विनी जाधव यांनी नमूद केले आहे.
