अंजनगाव सुर्जी येथे परिरक्षकासह तिघांवर गुन्हा, दोघांना अटक
अंजनगाव सुर्जी (प्रतिनिधी) –
दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.इंग्रजी विषयाच्या दोन उत्तरपत्रिका नियमानुसार कस्टडीत जमा न करता त्या खाजगी इसमाकडे लपवून ठेवल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अंजनगाव सुर्जी पोलीस ठाणे यांनी मोठी कारवाई केली आहे.या प्रकरणी मुख्य परिरक्षकासह तीन ज्ञात आणि दोन अज्ञात विद्यार्थ्यांविरुद्ध बीएनएस (भारतीय न्याय संहिता) तसेच महाराष्ट्र परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, शनिवारी उशिरा रात्री दोघांना अटक करण्यात आली आहे.कस्टडीऐवजी उत्तरपत्रिका खाजगी इसमाकडे इयत्ता दहावीच्या इंग्रजी विषयाची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर सर्व उत्तरपत्रिका विहित वेळेत कस्टडीत जमा करणे बंधनकारक असते. मात्र आरोपींनी संगनमत करून दोन उत्तरपत्रिका कस्टडीत जमा न करता त्या एका खाजगी इसमाकडे लपवून ठेवल्या. तपासात या प्रकारामागे गैरहेतू असल्याचे निष्पन्न झाले असून, परीक्षेच्या पवित्रतेलाच तडा गेला आहे.तक्रारीवरून गुन्हा नोंद रजनी शिरभाते, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद अमरावती यांच्या तक्रारीवरून पुढील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यामध्ये परिरक्षक सुधीर द. खोडे,उपपरिरक्षक सुशीलकुमार अभ्यंकर,खाजगी इसम अनिल हाडोळे,तसेच दोन अज्ञात विद्यार्थी यातील सुधीर खोडे आणि अनिल हाडोळे यांना अटक करण्यात आली आहे तर सुशीलकुमार अभ्यंकर फरार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई मनीष ठाकरे (एसडीपीओ) आणि सूरज बोंडे (ठाणेदार) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

(फोटो :- गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे )
शिकणं वर्तुळामध्ये खळबळ
बोर्ड परीक्षेत थेट परिरक्षकांचाच सहभाग असलेला हा गंभीर प्रकार उघड झाल्याने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कोठपर्यंत पसरले आहेत? लपवलेल्या उत्तरपत्रिकांचा नेमका उद्देश काय होता? याचा सखोल तपास सुरू आहे.या धडक कारवाईमुळे परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, भविष्यात अशा घटनांना आळा बसणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(फोटो :-फरार आरोपी शिक्षक सुशीलकुमार अभ्यंकर)
