परतवाडा पोलिसांचा शोध सुरू
अचलपूर / फिरोज खान
परतवाडा पोलीस ठाणे हद्दीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी “शोध पत्रिका” प्रसिद्ध करून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी जनतेकडे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा पोलीस स्टेशनअंतर्गत रताळा परिसरातील अचलपूर ग्रामीण विभागात दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह अज्ञात व्यक्तीचा असून, अंदाजे वय सुमारे ४० वर्षे आहे. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून प्रेत अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. वैद्यकीय तपासणीनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मृतदेहाजवळून कोणतीही ओळखपत्रे अथवा सामान सापडले नाही. त्यानंतर परतवाडा पोलिसांनी परिसरातील गावांमध्ये चौकशी सुरू केली असून, सध्या तरी या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात या अज्ञात पुरुषाचा मृतदेह सध्या ठेवण्यात आला आहे.
मृत व्यक्तीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे
वर्ण: गोरा-सावळा
शरीरयष्टी: कृश, अंदाजे वय ४० वर्षे
चेहरा: लांबट, दाढी-मिशा वाढलेल्या
दात: पुढचे दोन दात तुटलेले
वेषभूषा: अंगावर डार्क कलरची शर्ट, निळसर जीन्स पॅन्ट
विशेष खूण: डाव्या डोळ्याखाली लहानसा व्रण (खूण)
पोलीस निरीक्षक श्री. पुंड यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पो.हे.शि. राहुल साळुंखे, तसेच पोलीस शिपाई सुरेश सखारे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, जर कोणाला या वर्णनातील व्यक्तीची ओळख माहित असल्यास किंवा त्याच्याबद्दल काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ परतवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक:
पोलीस शिपाई सुरेश सखारे – ९२६०१४६४०६
पो.हे.शि. राहुल साळुंखे – ७३५०२६६५१०
पोलीस स्टेशन परतवाडा – ०७२२३-२३०५१०
पोलिसांच्या या आवाहनानंतर परिसरातील गावकरी आणि सामाजिक संस्था मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पुढे येत आहेत. पोलिसांनी सांगितले की, कोणतीही माहिती मिळाल्यास तपासात मदत होईल आणि मृत व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यास सोय होईल.
