दोन पत्रकारही रिंगणात
अचलपूर /फिरोज खान
अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ‘अ’ वर्ग नगरपरिषद असलेल्या अचलपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने वेगाने प्रक्रिया हाती घेतली.

असून प्रभाग आरक्षण, मतदार यादी व इतर तयारी पूर्ण झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा अधिक युवा उमेदवार मैदानात उतरले असून, महिलांना अर्ध्यापेक्षा जास्त आरक्षण मिळाले आहे.

नगरपरिषदेतील एकूण रचना
पूर्वी 39 नगरसेवक असलेल्या अचलपूर नगरपरिषदेतील या वेळी एकूण 41 नगरसेवक असतील. त्यापैकी 21 महिला नगरसेविका असतील. नगराध्यक्षपद धरून एकूण 22 महिला प्रतिनिधी नगरपरिषदेत असणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून निवडणुका न झाल्याने नगरपरिषद प्रशासकाच्या ताब्यात होती. मुख्याधिकारी प्रशासक म्हणून कार्यरत होते. मात्र, आता निवडणुकीची घोषणा होताच शहरात राजकीय वातावरण तापले आहे.

युवा आणि नव्या चेहऱ्यांचा उत्साह
यंदा अचलपूरमध्ये अनेक नवोदित आणि युवा समाजसेवक निवडणुकीत उतरणार आहेत.प्रभाग क्र. 13 (ब गट) येथून पत्रकार मोहम्मद अजहरूद्दीन मैदानात आहेत.प्रभाग क्र. 19 (सर्वसाधारण) येथून पत्रकार फिरोज खान निवडणूक लढवत आहेत.प्रभाग क्र. 17 मधून समाजसेवक मोहम्मद कदीर पहलवान यांच्या कुटुंबातील नसरीन बानो यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

प्रभाग क्र. 18 (जगदंबा देवी विभाग) मधून शिवसेनेचे शहराध्यक्ष व युवा नेते गजानन फिस्के आणि निकेश पिंपळकर स्पर्धेत आहेत.प्रभाग क्र. 15 (ओबीसी महिला) मधून भाजपच्या नेहा महेंद्र बुंदेले मैदानात उतरल्या आहेत.प्रभाग क्र. 12 (ओबीसी) मधून प्रहार जनशक्ती पक्षाचे मोहम्मद बाकीर अन्सारी स्पर्धेत आहेत.या सर्वांसह विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष युवा उमेदवार देखील आपली ताकद आजमावत आहेत.
विकासासाठी कटिबद्ध युवा
अनेक वर्षांपासून विकासकामांमध्ये अडथळे येत असल्याने युवकांमध्ये असंतोष वाढला आहे. यंदा निवडणुकीत उतरणारे सर्वच युवा उमेदवार म्हणतात की,“अचलपूरचा अपेक्षित विकास झालाच नाही. नागरिकांच्या समस्या सोडवून शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
पक्षांची तयारी आणि संभाव्य आघाड्या
नगराध्यक्षपदासाठीही इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार आणि एमआयएम हे सर्व पक्ष स्वतंत्रपणे तयारी करत आहेत.दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाड्यांमध्ये गठबंधनाची चर्चा अद्याप झालेली नाही, मात्र निवडणुका जवळ आल्याने गठबंधनाची शक्यता नाकारता येत नाही.अचलपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा युवा आणि महिलांचे प्राबल्य ठळकपणे दिसून येत आहे. दोन पत्रकार, अनेक नवोदित समाजसेवक, आणि विविध पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.शहरातील नागरिकांनाही या निवडणुकीकडून मोठ्या अपेक्षा असून, “युवकांच्या नेतृत्वाखाली अचलपूरचा विकास होईल” असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
