विद्यार्थ्यांनी जीवनात नेहमी सकारात्मक विचार करावा.
वक्ते, पंकज वंजारे
चांदूरबाजार / तालुका प्रतिनिधी
स्थानिक गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संपूर्ण जिल्ह्यात आपल्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाकरिता प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध विषयांवर नियमित कार्यक्रम घेतले जात असतात. संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. दादासाहेब टोम्पे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण विदर्भात व्याख्यानाकरिता प्रसिद्ध असलेले वर्धा येथील श्री पंकज वंजारे यांचे ‘आम्ही कसे घडलो कसे बिघडलो’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होेते. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भास्करदादा टोम्पे, संस्थेचे सचिव डॉ. विजय टोम्पे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, भाई देशमुख, रवि कोंडे, मदन भाटे, रवी संगेकर, प्राचार्य संजय शेजव, प्राचार्य मनीष सावरकर, प्राचार्य मनीष खोंड, उपप्राचार्य नंदकिशोर गव्हाळे, डॉ. रवींद्र डाखोरे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष माननीय भास्करदादा टोम्पे यांचे हस्ते प्रमुख वक्ते पंकज वंजारे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.प्रमुख वक्ते पंकज वंजारे मानवी उत्क्रांतीचा इतिहास छोट्या छोट्या उदाहरणातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच आपल्या मनातील नकारात्मकता माणसाला आपल्या विकासापासून कशी रोखते या संदर्भातही सविस्तर मार्गदर्शन केले. याबरोबरच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकरिता शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे असे आव्हान करून विद्यार्थ्यांच्या विकासात येणाऱ्या विविध अडचणीची त्यांनी सखोल मांडणी केली तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता कुटुंब समाज व स्वतः विद्यार्थी कसा कारणीभूत ठरू शकतो याबाबत मार्गदर्शन केले तर विद्यार्थ्यांच्या कल्याण व विकासाकरिता संस्थेचे अध्यक्ष सचिव सर्व शिक्षक कटिबद्ध आहेत असे आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्यांनी भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. सचिन भोंबे यांचे कृषी भूगोल हे पुस्तक मान्यवरांमार्फत प्रकाशित करण्यात आले. या भावपूर्ण कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रियदर्शनी देशमुख यांनी केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात डॉ. रवींद्र डाखोरे यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडत असताना स्व. केशवरावदादा टोम्पे यांच्या आठवणींना उजाळा दिला व महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.लालबा दुमटकर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बंधू व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
