वेतन, नियुक्ती व आरक्षणाच्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर आंदोलनाचा इशारा
धामणगाव रेल्वे/ तालुका प्रतिनिधी
राज्य सरकारकडून निवडणुकांपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने मुख्य युवा प्रशिक्षणार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी, धामणगाव रेल्वे येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना आहे त्या आस्थापनेवर नियमित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रशिक्षणाचा ११ महिन्यांचा कालावधी संपत आला असूनही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने प्रशिक्षणार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर अल्प मुदतीसाठी कालावधी वाढवण्यात आला होता; मात्र आता तोही संपत आल्याने प्रशिक्षणार्थींचे भवितव्य अधांतरी आहे.
प्रशिक्षणार्थ्यांनी शासनाला दिलेल्या मागण्यांमध्ये –
1. तीन महिन्यांपासून थकलेले विद्यावेतन तात्काळ देण्यात यावे.
2. ११ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कायम नियुक्ती करून किमान वेतन कायद्यानुसार ₹२०,००० मानधन देण्यात यावे.
3. रुजू दिनांकापासून वयोमर्यादा ग्राह्य धरावी.
4. शासकीय भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थ्यांना १० टक्के आरक्षण देण्यात यावे.या मागण्यांकडे शासनाने लक्ष न दिल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.हे आंदोलन युवाहित युवा कार्यप्रशिक्षणार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश साबळे आणि संघर्ष मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, तालुका अध्यक्ष प्रीतम घुंगरूड यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.हे आंदोलन प्रशासनाला आश्वासनांची आठवण करून देणारे ठरणार असल्याचे प्रशिक्षणार्थ्यांनी नमूद केले आहे.
