चांदूर बाजार/एजाज खान
गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजार येथील वनस्पतीशास्त्र विभागाने वन्यजीव सप्ताह – २०२५ च्या उत्सवामध्ये सक्रिय सहभाग नोंदवित “मानव व वन्यजीव : संघर्ष ते सहअस्तित्व” या विषयावर वनसंचालक, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली, वन्यजीव सप्ताह – २०२५ च्या निमित्ताने ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन केले. हे व्याख्यान मा. अजिंक्य भटकर, मान. वन्यजीव रक्षक, नागपूर यांनी दिले. ते अनेक वर्षांपासून वन्यजीव संरक्षण उपक्रमांमध्ये कार्यरत असून, आपल्या प्रेरणादायी व्याख्यानात त्यांनी मानव–वन्यजीव संघर्षाच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकला आणि मानव व वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्व साधण्यासाठी शाश्वत दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. तसेच, जैवविविधतेचे रक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखणे ही प्रजातींच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी किती महत्त्वाची आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. हे सत्र महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी थेट प्रक्षेपित करण्यात आले. या व्याख्यानातून मौल्यवान माहिती मिळाली तसेच संवर्धन उपक्रमात आपापल्या परीने योगदान देण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मिळाली.या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. आर. एस. रामटेके, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वाय. एम. राजगुरे तसेच कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. यू. आर. कनेरकर उपस्थित होते. महाविद्यालयीन परिवाराने या उपक्रमाचे कौतुक करून, तो वन्यजीव संरक्षणाविषयी जनजागृती व मानव–निसर्ग यांच्यातील नाते दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे नमूद केले.
