सप्तमी-अष्टमीच्या संयोगाने माहूरगडावर भक्तिभाव, श्रद्धा व उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
श्रीक्षेत्र माहूरगड / संजय घोगरे
साडेतिन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूरगडावर शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात सुरू आहे. आज सप्तमी व दुपारनंतर अष्टमीचा शुभयोग आल्याने घटास माळ अर्पण करण्यात आली. या विशेष प्रसंगी आई श्री रेणुका मातेस निळ्या रंगाचे महावस्त्र परिधान करून फुलांची आरास, पुरातन अलंकार, पायास नैवेद्य, विडा-तांबूल अर्पण करण्यात आले. त्यानंतर महाआरती पार पडली. मातेच्या दरबारात कुमारिका पूजन विधीही भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी श्री रेणुकादेवी संस्थानचे पुजारी मंडळ उपस्थित होते.आज दिवसभरात रसिक कलाकारांनी भक्तिगीत, कीर्तन व सेवा अर्पण करून सभोवतालचे वातावरण दैवी मंगलमय केले.दरम्यान,

श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन दहा दिवस सुरू असते. महाप्रसादाची संपूर्ण जबाबदारी अरुण घोडेकर, आकाश वानखेडे, संदीप जामोदकर तसेच सुरक्षा रक्षक राजू कराळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. भाविकांना महाप्रसादाचे नियोजित ठिकाण स्वच्छ व नीटनेटके असल्याचा अनुभव मिळाला. यामध्ये फराळ व भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.आज सोमवार असल्याने सकाळच्या सत्रात भाविकांची गर्दी थोडी ओसरली होती. परंतु दुपारनंतर पावसाला विश्रांती मिळताच भाविकांनी गडावर मोठ्या संख्येने हजेरी लावली व आई रेणुका मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला.
