रस्त्यांची दुरुस्ती आणि ग्रामविकास उपक्रम राबविले
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गटग्रामपंचायत खेडपिंपरी येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायतराज पंधरवाड्यानिमित्त दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामविकासासाठी विविध उपक्रम गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून राबविण्यात आले.लवकरच अमरावती-नेर बससेवा पापड-खेड पिंपरी-पिंपळगाव-निपाणी-सालोड-मंगरूळ मार्गाने सुरू होणार असल्याने वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार रस्त्यातील अडथळे दूर करण्याचे काम ग्रामस्थांनी हाती घेतले. गावातील युवकांनी श्रमदान करून खेड पिंपरी ते पापड पर्यंतचा रस्ता पूर्णपणे मोकळा करून दिला. रस्त्यावर लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्या कापून रस्ता स्वच्छ करण्यात आला.श्रमदानाच्या माध्यमातून गावातील दोन फुटलेले रापटे दुरुस्त करण्यात आले.

या कामासाठी सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांनी आपले शासनाकडून मिळणारे एका महिन्याचे मानधन, म्हणजेच तब्बल ४५०० रुपये ग्रामस्थांच्या सेवेसाठी खर्च करून आवश्यक साहित्याची खरेदी केली. या कृतीने सरपंचांनी आदर्श निर्माण केला. तसेच नाली उपसून स्वच्छता अभियानही राबविण्यात आले.गावांतर्गत रस्त्यांमध्ये अडथळा निर्माण करणारे टिनशेड स्वतःहून काढून टाकण्यासाठी सरपंच मंगेश कांबळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहकार्य केले. यामध्ये गोरखनाथ राऊत, सतीश भारती,कल्पना बन आदींचा समावेश होता.या श्रमदान मोहिमेत नव-नियुक्त अहिल्यादेवी होळकर तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल शेळके,तसेच आकाश भोंडे, गौरव चौधरी, रुपेश राऊत, विजय चौधरी,अंकुश जाधव, ओम शेळके,अजय चौधरी, प्रवीण अंबाडारे,नाना राऊत, दयाराम राऊत,ईश्वर विटकरे, शिवम चौधरी,प्रमोद राऊत, हरीकेशव भारती,वाघा राऊत, रामचंद्र ठाकरे,रामेश्वर विटकरे, आकाश काकडे,गोविंद तटे यांसह गावातील अनेक युवकांनी श्रमदान करून उत्कृष्ट कामगिरी बजावली.सरपंच मंगेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या श्रमदान उपक्रमातून खेड पिंपरी ग्रामविकासाचे एक आदर्श उदाहरण घालून दिले गेले आहे.
