सुरू असलेल्या बसेस वेळेत व अतिरिक्त बसेस सुरू करण्याची मागणी
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुरू असलेल्या बसेस वेळेत पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वेळेत पोहोचता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात विभाग नियंत्रक यांचे कार्यालयात धडक देऊन विभाग नियंत्रक बेलसरे यांना एक तास घेराव करून निवेदन सादर केले.

नांदगाव तालुक्यातील मांजरी म्हसला, येरणगाव, सातरगाव, कंझरा, गोळेगाव,पिंपळगाव, मंगरूळ चव्हाळा, येणस, सावनेर, टीमटाळा, बोरी, वाई, टोंगलाबाद या गावातील शेकडो विद्यार्थ्यांकरिता सुरू असलेली बसेस कधीच वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व इतर शाळेच्या वेळेत दोन तास उशीरा पोहचत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच परत जाताना सुद्धा बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींना रात्रीचे घरी जायला नऊ वाजतात त्यामुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच सदर मार्गाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्याने एकाच बस मध्ये दीडशे च्या वर विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो बसची क्षमता नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवास केल्याने बस चे बॅलन्स जाऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विद्यार्थ्यांना सदर बस मध्ये उभे राहायला सुद्धा जागा नसते त्यामुळे सदर मार्गाने अतिरिक्त बस सुरू करण्याची मागणी यावेळी केली चांदुर रेल्वे डेपो बडनेरा डेपो या डेपोच्या अतिरिक्त बस सुरू कराव्या अशीही मागणी केली यावेळी विद्यार्थ्यांनी विभाग नियंत्रक कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रचंड रोष व्यक्त केला दरम्यान विभाग नियंत्रक यांनी चांदुर रेल्वे आगार प्रमुख बडनेरा आगार प्रमुख यांना निर्देश देऊन महाविद्यालयीन वेळेतच बसेस सोडाव्या व अतिरिक्त बस तात्काळ सुरु करावी असे निर्देश दिले यावेळी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब राणे पंकज पिंपळकर युवा सेनेचे अजय घरडे अमित पाध्ये अक्षय हिवराळे पवन शिरभाते प्रेम हिवराळे यांचेसह विद्यार्थी आशिष शिंदे,ओम राठोड,रितेश पाटील,श्रुतिका लोमटे,लक्ष्मी अलोने,श्रुती माकडे,आरती मडके,श्रुती मारोटकर वैष्णवी मुके,संजना मोटघरे इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.
