आक्रमक होत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
शहरातील मुतारी, स्मशानभूमी, दारू दुकाने, सर्व्हिस गल्ल्यांच्या भिंतींसारख्या आक्षेपार्ह ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांची पोस्टर्स लावण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे जनतेच्या श्रद्धेचा अवमान होत असून सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या शहर युवक कॅांग्रेस पदाधिकाऱ्यांनी धर्मादाय कॅाटन फंड व बच्छराज प्लॅाट परिसरातील आपमानास्पद पद्धतिने लावलेली पोस्टर्स झाकून सरकारविरोधात तीव्र नारेबाजी केली.संबंधित समाजकंटकांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अपमानास्पद ठिकाणी लावलेली पोस्टर्स त्वरित काढावीत व अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन व महानगरपालिकेने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी युवक कॅांग्रेसद्वारे यावेळी करण्यात आली आहे.२०१४ साली भाजपा सत्तेत आल्यानंतर आरएसएस व भाजपसंबंधित घटकांकडूनही महापुरुषांचा वारंवार अपमान केला जात आहे. कधी महापुरुषांच्या विचारांची तोडमोड केली जाते, तर कधी त्यांच्या प्रतिमा व संदेशांचा चुकीच्या ठिकाणी वापर करून जनतेच्या भावना दुखावल्या जातात. या पार्श्वभूमीवर सद्यप्रसंगाकडे दुर्लक्ष न करता कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे युवक कॅांग्रेसचे म्हणणे आहे.या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून त्यासंबंधीची पोलीस तक्रारसुद्धा सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला युवक कॅांग्रेसने दाखल केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.यावेळी वैभव देशमुख, समीर जवंजाळ, सागर कलाने, आशिष यादव, निखिल बिजवे, संकेत साहू, शुभम बांबल, चैतन्य गायकवाड, धनंजय बोबडे, मोहीत भेंडे, शुभम हिवसे, कृणाल गावंडे, कौस्तुभ देशमुख, केदार भेंडे, अभिषेक भोसले, साहिल वानरे, निशांत पवार हे युवक कॅांग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
