गावकऱ्यांचे हाल,विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प,
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर–गोळेगाव रोडवरील पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पुलाचे काम दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. जुन्या पुलाचे तोडकाम करून नवा पूल उभारण्यास सुरुवात झाली होती.मात्र काम मध्यंतरात थांबले. परिणामी चार गावांतील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.खानापूर, गोळेगाव, जगतपूर व मलकापूर या चार गावांचे शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून या समस्येचा फटका बसत आहे. शेतमाल वाहतूक अडली असून शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांचे शिक्षणही ठप्प झाले आहे. विशेष म्हणजे, या पुलाच्या खड्ड्यात काही काळापूर्वी आदिवासी पारधी समाजातील तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले, ही अतिशय खेदाची बाब असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

गावकरी मनोहर बगळे यांनी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार अमर काळे यांना दिलेल्या निवेदनात ११ सप्टेंबर २०२५ पासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलावरचे तात्पुरते ड्रायव्हर शन वाहून गेले असून, गावकऱ्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे असे नमूद केले आहे.या पुलाच्या कामाच्या अर्धवट अवस्थेमुळे गावकऱ्यांना शेतात जाणे, रुग्णांना वेळेत दवाखान्यात नेणे, विद्यार्थ्यांना शाळा-काॅलेजला जाणे अशक्य बनले आहे. त्यामुळे शासन व संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून काम पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
