वाघळी नदीत हजारो मासे व साप पडले होते मृत्युमुखी;
नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात शिरतेय विषारी पाणी;
नांदगाव पेठ/ मंगेश तायडे
नांदगाव पेठ परिसरात पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारी घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागील वर्षी २२ जुलै रोजी एसएमएस कंपनीचे दूषित व विषारी पाणी वाघळी नदीत मिसळल्याने हजारो मासे व साप क्षणात मृत्युमुखी पडले होते. केवळ जलचर नव्हे तर नदीच्या काठावर येणाऱ्या जनावरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने पंचनामा करून पाणी जनावरांसाठी तसेच जलचर प्राण्यांसाठी धोकादायक असल्याचा अहवाल तयार केला होता. परंतु सदर अहवाल कंपनीच्या व्यवस्थापकाने दडवून ठेवल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.दरवर्षी एसएमएस कंपनीकडून बाहेर पडणाऱ्या विषारी पाण्यामुळे निसर्गाचे प्रचंड नुकसान होत आहे. एवढ्यावरच थांबत नाही, तर हे केमिकलयुक्त पाणी थेट नांदगाव पेठ परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात शिरत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जनावरांचे जीव गेले, नदीतील जलचर प्राणी संपले,

पिण्याचे पाणी दूषित झाले तरीही प्रशासन मात्र आंधळे-बधिर झाल्यासारखे वागत आहे.यामुळे नागरिकांचा संताप उफाळून येत आहे. जर प्रशासन कंपन्यांच्या दबावाखाली काम करून अहवाल दडवणार असेल, तर लोकांच्या जीवाची सुरक्षा कोण करणार? आरोग्य विभागाने तयार केलेला स्पष्ट व ठोस अहवाल दडवून ठेवणे म्हणजे सामान्यांच्या आरोग्याशी सरळ खेळ असून, हा प्रकार पर्यावरणीय गुन्ह्याइतकाच गंभीर आहे.आजवर प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, ही बाब नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण करत आहे. दरवर्षी याच प्रकारे विषारी पाण्याचे सत्र सुरू राहते आणि दरवर्षी नदी, प्राणी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. प्रशासनाचे हे मौनच नागरिकांच्या रोषाला खतपाणी घालत आहे.भविष्यात याकडे दुर्लक्ष केले तर नांदगाव पेठ परिसरात मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक संकट उद्भवेल, हे नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
या संदर्भात पंचायत समिती मधील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही अहवाल प्रशासनाला सादर केला त्यांनतर एसएमएस कंपनीला देखील पत्र दिले मात्र नंतर एसएमएस कंपनीच्या व्यवस्थापकाने मुख्य अहवाल दडविला असे लक्षात आले.प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि एसएमएस कंपनीचे व्यवस्थापक यांची मिलीभगत असल्यामुळे या कंपनीवर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
