दरवर्षी पिकांची हानी, नुकसानभरपाई व कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
अंजनगाव सुर्जी / तालुका प्रतिनिधी
मौजा गावंडगाव बु. येथील शेतकरी दरवर्षी पाण्याच्या तडाख्यामुळे शेती आणि उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसत आहेत. चिंचोली बु. ते गावंडगाव बु. या मार्गाने पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे पाणी थेट शेतात घुसत असल्याने शेती खरडून जाते आणि पिकांचा विलय होतो.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करून तातडीने नुकसानभरपाई आणि वाहत्या पाण्याच्या कायमस्वरूपी विल्हेवाटीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती
गावंडगाव बु. येथील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून प्रत्येकाकडे सरासरी १.५० हेक्टर इतकीच शेती आहे. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे त्यांची आर्थिक स्थिती डगमगली असून, यापूर्वी अनेकदा पिकांचे नुकसान झाले तरीही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही.तलाठी व कृषी सेवक यांनी काही वेळा पाहणी केली असली तरी अहवाल शेतकऱ्यांना मिळाला नाही किंवा त्याची विल्हेवाट लावण्यात आली नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

शेतकरी शिल्पा महेंद्र कात्रे यांची वेदना
“आमच्या शेतीलगतचा बांध फुटल्यामुळे शेत खरडून गेले आहे. पिके नष्ट झाली असून शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येते आहे. दरवर्षी हा प्रश्न कायम राहतो, पण प्रशासन केवळ पाहणी करून फाइल दाबून टाकते. आम्हाला योग्य नुकसानभरपाई मिळावी आणि वाहत्या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा, ही आमची मागणी आहे,” असे शेतकरी शिल्पा महेंद्र कात्रे यांनी सांगितले.
प्रशासनाकडे तातडीची मागणी
शेतकऱ्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग तसेच मंडल अधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या प्रतिलिप्या सादर केल्या असून, तातडीने ठोस निर्णय घेऊन उपाययोजना करण्यात याव्यात, असा आग्रही सूर त्यांनी लावला आहे.
