शिक्षकांनी आपले आरोग्य सांभाळून देशसेवा करण्याचे डॉ राजू डांगे यांचे आवाहन
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
समूह साधन केंद्र, मांजरी म्हसला अंतर्गत सर्व शाळा मधील शिक्षकांची शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कंझरा येथे मोठ्या उत्साहात दिनांक २८ ऑगस्ट रोजी संपन्न झाली.शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत, कंझरा येथील सरपंच सौ. फइमूनिसा शेख होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी विलास बाबरे , प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजू डांगे, केंद्रप्रमुख अनिल कोल्हे होते. शिक्षण परिषदेमध्ये विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. योगिता पिंजरकर, मुख्याध्यापक मधुसूदन काळमेघ, सूरज मंडे, जितेंद्र यावले यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. ईश्वराने आपणास अनेक अमूल्य बाबी अगदी मोफत दिल्या असून आपल्या दैनंदिन जीवनातील ताणतणाव दूर ठेवण्यासाठी दररोज किमान एक तास आपल्या शरीराला देऊन योगा, व्यायाम व ध्यान नियमित करावे जेणेकरून आपण आपल्या पूर्ण क्षमतेने विद्यार्थी विकासाचे पवित्र कार्य करू शकू व जेव्हा आपण पूर्ण क्षमतेने काम करू तेव्हाच आपले हातून देशसेवा घडेल असे आपले ओजस्वी वाणीतून मार्गदर्शन करतांना डॉ. राजू डांगे यांनी प्रतिपादन केले. विस्तार अधिकारी श्री विलास बाबरे यांनी शिक्षकांनी दातृत्व भावनेने काम करण्याचे आवाहन केले.केंद्रप्रमुख अनिल कोल्हे यांनी पुढील काळात आपल्या जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवावा लागेल त्यासाठी शासनाच्या सर्व योजना व उपक्रम प्रभावीपणे राबवावे लागतील. जिल्हाधिकारी मा. आशिष येरेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संजिता महापात्र यांनी मिशन आरंभ अंतर्गत १००% विद्यार्थी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्याचे आवाहन केले तसेच शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कंझरा येथील शिक्षकांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला.शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक मनोज भांदर्गे, अनघा भोपळे, परमानंद वैष्णव, अनिल देशमुख, राजेश देशमुख, संजय नेवारे, सूरज मंडे, रविंद्र गजभिये, हेमलता भिमटे, श्री वाके सर यांनी परिश्रम घेतले. शिक्षण परिषदेला शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मांजरी म्हसला केंद्रांतर्गत शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
