अधिकाऱ्यांचा टाळाटाळीचा पवित्रा
धामणगाव रेल्वे /तालुका प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा मानबिंदू असलेल्या राष्ट्रध्वजाचा अवमान धामणगाव रेल्वे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहासमोर झाल्यानंतर तब्बल १५ दिवस उलटून गेले, तरीही अधिकाऱ्यांनी साधी दखलही न घेतल्याने संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रध्वज फडकविताना ध्वजसंहितेचे उल्लंघन करून तो तब्बल २ फुट खाली फडकाविण्यात आला. या घटनेविरोधात स्थानिक नागरिक सलील सच्चिदानंद काळे यांनी पुराव्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांना तक्रार दाखल केली. तरीदेखील आजवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.१५ ऑगस्ट रोजी झालेल्या या प्रकाराची दखल घेत काळे यांनी घटनास्थळाचे छायाचित्र काढून पुराव्यासह ई-मेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग तसेच लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. इतकेच नव्हे, तर १७ ऑगस्ट रोजी स्थानिक वृत्तपत्रांतूनही या घटनेचा समाचार प्रसिद्ध झाला. तरीदेखील प्रशासनाने कारवाई टाळली असल्याचे स्पष्ट होत आहे.
अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती : “या प्रकरणात मला काहीही माहिती नाही. तक्रारीचा मेल पुन्हा पाठवा, मी पाहतो,” असे त्यांनी २६ ऑगस्ट रोजी सांगितले. त्यानंतर त्यांना मेल पाठविण्यात आला; मात्र त्यानंतर त्यांच्या संपर्कासाठी केलेले कॉल त्यांनी स्वीकारले नाहीत.
तेजश्री कोरे, उपविभागीय अधिकारी, चांदुर रेल्वे : “मला या प्रकरणाची काहीही माहिती नाही. वरीष्ठ कार्यालयाकडून कुठलेही निर्देश आलेले नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अभय घोरपडे, तहसीलदार, धामणगाव रेल्वे : “मी ही घटना वृत्तपत्रातून वाचली आहे. मात्र या संदर्भात अद्याप वरीष्ठ कार्यालयाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत. निर्देश मिळाल्यानंतरच पुढील कारवाई करू,” असे त्यांनी सांगितले.
तक्रारीची प्रत पाठविण्यात आलेली कार्यालये
जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती, विभागीय आयुक्त अमरावती, सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग महाराष्ट्र राज्य, उपलोकायुक्त महाराष्ट्र राज्य, लोकायुक्त महाराष्ट्र राज्य.या प्रकरणामुळे राष्ट्रीय प्रतिकांच्या सन्मानापेक्षा राजकीय संबंध आणि अधिकाऱ्यांची अनास्था वरचढ ठरत आहेत का? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे. तक्रार दाखल करूनही पंधरा दिवस उलटले, तरीही कोणतीही कार्यवाही न झाल्याने राष्ट्रध्वजाचा सन्मान प्रत्यक्षात वाऱ्यावर उडत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
