३० लाखांवरील व्यवहारांची चौकशी
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण सहनिबंधक कार्यालयात आयकर विभागाच्या इंटेलिजन्स अँड क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन (I & CI) विंगने मोठी तपासणी मोहीम राबवली.२०१९ ते २०२४-२५ या पाच वर्षांतील ३० लाख रुपयांवरील सर्व व्यवहारांची छाननी या तपासणीत करण्यात आली. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईनंतर विभागाकडून लवकरच अधिकृत पत्र प्रसिद्ध केले जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
तपासणीतील मुख्य मुद्दे
जमीन व मालमत्ता व्यवहारात किंमत कमी दाखविण्यात आली आहे का?
रेडीरेकनरपेक्षा कमी किमती दाखवून नोंदणी करण्यात आली आहे का? धरसोड शुल्क व कर टाळण्याचा प्रयत्न झाला आहे का? या सर्व बाबींची तपासणी करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

तक्रारीवरून कारवाईला सुरुवात
खापर्डे बगीचा येथील एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर ही धडक तपासणी सुरू झाली असल्याची चर्चा आहे. संबंधित तक्रारीत परदेशातील नोटरी भारतात वैध मानली जाऊ शकते का? या अनुषंगाने विविध व्यवहारांमध्ये गैरप्रकार होत असल्याचा मुद्दा विशेषत्वाने मांडण्यात आला होता. त्यामुळे या चौकशीतून मोठ्या घडामोडी उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यापूर्वीच चर्चेत आलेले कार्यालय
यापूर्वीच राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कार्यालयाची अचानक पाहणी केली होती. त्यामुळे आता झालेली आयकर विभागाची कारवाई अधिक चर्चेचा विषय ठरत आहे.
