भाविक व व्यापाऱ्यांमध्ये नाराजी
माहूर/ संजय घोगरे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानला जाणारा श्री रेणुका मातेच्या गडावरील स्कायवॉक प्रकल्प अडखळल्याने भाविक व स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.सुमारे 51 कोटींचा निधी देऊन हा प्रकल्प 2023 मध्ये मंजूर झाला. भाविकांना दर्शनासाठी सुलभता व गर्दीवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने हा स्कायवॉक उभारण्यात येणार होता. १८ महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट ठेकेदारांवर टाकण्यात आली होती.

त्यासाठी वनविभागातील तांत्रिक अडचणीही सोडवण्यात आल्या.29 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी सहमती दर्शवून कामाला सुरुवात झाली. मात्र, दोन वर्ष उलटूनही कामाचे केवळ ३०% पेक्षाही कमी प्रगती झाली आहे. परिणामी स्कायवॉकसाठी दुकानदारांनी रिकामी केलेली जागा सध्या वाहन पार्किंगसाठी वापरली जात असून मोठा सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे.येत्या नवरात्रीत माहूर गडावर विक्रमी गर्दी अपेक्षित असताना काम ठप्प असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. व्यापाऱ्यांनी प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी केली आहे.दरम्यान, काम बंद झाले का?, असा प्रश्न आता गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मनात निर्माण झाला आहे.
