या प्रकल्पातून ३३५० शेतकऱ्यांचा दिवसा वीज
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत जिल्ह्यात अमरावती ग्रामिण विभागातील नारगावंडी (५ मेगावॅट) आणि भातकूली (४ मेगावॅट) ही विकेंद्रीत स्वरूपाची दोन सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्याने परिसरातील ३ हजार ३५० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.शेतकऱ्या दिवसा आणि शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात १६ हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे.त्यापैकी जिल्ह्यात ९० उपकेंद्रासाठी विकेंद्रीत स्वरूपाचे सौर प्रकल्प उभारून ३२८ मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येनार आहे नारगावंडी येथे उभारण्यात आलेले सौर प्रकल्प हे ५ मेगावॅट क्षमतेचे असून २५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आला आहे. मे. पुरुषोत्तम प्रोफाईल्स या विकासकाकडून उभारण्यात आलेल्या या सौर प्रकल्पामुळे ३३ केव्ही नारगावंडी उपकेंद्राअंतर्गत वीज पुरवठा होत असलेल्या २३०० शेतकऱ्यांना दिवसा विजेच्या स्वरूपात या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. तसेच ४ मेगावॅट क्षमता असलेल्या भातकूली सौर प्रकल्प हे २० एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आले असून या प्रकल्पामुळे परिसरातील १०५० शेतकऱ्यांना दिवसा विजेचा मार्ग मोकळा झाला असून मे. रविंद्र एनर्जी या विकासकाकडून हे प्रकल्प उभारण्यात आले आहे.यापूर्वी जिल्ह्यात उसळगव्हाण (३ मे.वॅ), मंगरूळ दस्तगीर (३ मे.वॅ), माहुली जहांगीर (५ मे.वॅ), क्षमतेचे ३ सौर प्रकल्प सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकुण २० मेगावॅट क्षमतेचे ५ सौर प्रकल्प कार्यान्वित झाले असून ८५५० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळायला सुरूवात झाली आहे.
