PWD विश्राम गृह येथील ध्वजारोहण,
राष्ट्रीय सन्मानाला तडा, जनतेत संतापाची लाट
धामणगाव रेल्वे /सलील काळे
स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र दिवशी, धामणगाव रेल्वे तालुक्यातील भगतसिंग चौक येथे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) इमारत व दळणवळण विभागाच्या (B&C) विश्राम गृह येथील राष्ट्रध्वज फडकविताना गंभीर नियमभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे.भारतीय राष्ट्रध्वज संहिता व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार, राष्ट्रध्वज ध्वजस्तंभाच्या सर्वोच्च भागात शीर्ष स्थानी, संपूर्ण मान-सन्मान राखून फडकवणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित शासकीय विश्राम गृहात 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज सर्वोच्च टोकावर न फडकविता, खालच्या पातळीवर लावण्यात आला. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचे स्पष्ट चित्र नागरिकांच्या नजरेस पडले.
कायद्याचे उल्लंघन
ही घटना केवळ नियमभंग नसून ‘भारतीय राष्ट्रध्वज संहिता’, ‘राष्ट्रध्वजाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971’ तसेच भारतीय दंड संहिता कलम 2(व), कलम 3 आणि संबंधित शासकीय परिपत्रकांचे उल्लंघन करणारी आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार शासकीय जागेवर आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घडला असून, वरिष्ठ अधिकारी व जबाबदार कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे राष्ट्रीय सन्मानाला तडा गेला आहे.
जनतेच्या ठाम मागण्या
या प्रकरणी सुज्ञ नागरिकांच्या मनात संतापाची लाट निर्माण झाली असून 15 ऑगस्ट रोजीच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीत पुढील कारवाईच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. घटनेची तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करावी.
राष्ट्रध्वज अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत गुन्हे दाखल करावेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना राष्ट्रध्वज फडकविताना नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत त्वरित लेखी आदेश व सूचना द्याव्यात.
PWD विभागावर गंभीर आरोप-
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जनतेत PWD (B&C) विभागाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा विभाग निकृष्ट दर्जाचे काम, रोड व इमारतींच्या बांधकामात कमिशनखोरी आणि भ्रष्टाचारासाठी कुप्रसिद्ध आहे. मात्र, राष्ट्रीय ध्वजाच्या सन्मानाच्या बाबतीत त्यांनी दुर्लक्ष केल्याने जनतेचा रोष अधिक भडकला आहे.स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून, “काम निकृष्ट, पैसे खातात; पण देशाच्या सन्मानाला लागणारा धक्का मात्र दुर्लक्षित करतात” अशी टीका होत आहे.
त्वरित कारवाईची अपेक्षा
ही घटना राष्ट्रीय सन्मानाशी निगडीत असल्याने, नागरिकांनी याकडे अत्यंत गांभीर्याने पाहून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, या प्रकरणावरून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
