
गेल इंडिया लिमिटेड तर्फे सीएसआर फंड
चांदुर बाजार / एजाज खान
चांदूरबाजार येथील गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गो. सी. टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट व गेल इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अंडर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंड अंतर्गत महाविद्यालयातील किशोरवयीन मुलींसाठी “सपोर्ट फॉर हेल्थ अँड न्यूट्रिशन ऑफ गर्ल्स (२०२५-२६)“ योजनेचे उदघाटन नुकतेच स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनी थाटात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष भास्करदादा टोम्पे, उदघाटक म्हणून गेलचे माजी स्वतंत्र डायरेक्टर डॉ. रविकांत कोल्हे, संस्थेचे सचिव डॉ. विजय टोम्पे, प्रमुख मार्गदर्शक डॉ. ताराचंद कंठाळे, बापूजी दाते महाविद्यालय, यवतमाळ, डॉ. आशिष हिरावे वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, चांदूरबाजार, पोलिस निरीक्षक श्री अशोक जाधव साहेब चांदूर बाजार, मा. राजेशजी गोयनका मा. राजेंद्र बाळापुरे,प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, प्राचार्य डॉ. संजय शेजव, प्राचार्य मनीष सावरकर, उपप्राचार्य डॉ. नंदकिशोर गव्हाळे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. सुमित इंगळे, प्रा. सुनील ढोले प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.“सपोर्ट फॉर हेल्थ अँड न्यूट्रिशन ऑफ गर्ल्स “योजना गेल इंडिया लिमिटेड या कंपनी तर्फे मान्य CSR फंड द्वारे मुलींच्या आरोग्य व पोषण आहारा संदर्भात २०२५-२६ या वर्षात राबवण्यात येईल या योजनेचा उद्देश मुलींच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे, कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, मुलींच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, मुलींना सक्षम बनवणे असून या योजनेमुळे मुलींना सशक्त आणि निरोगी जीवन जगण्यास मदत होईल असे मत उदघाटक डॉ. रविकांत कोल्हे यांनी मांडले तसेच पुढे म्हणाले, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गो. सी. टोम्पे महाविद्यालय अशा प्रकारचे मुलींच्या आरोग्य व पोषण आहरासंबंधी योजना राबवणारे हे पहिलेच महाविद्यालय असल्याचे सांगून यामुळे उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढेल असेही म्हणाले. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. ताराचंद कंठाळे म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. भगतसिंग सारख्या क्रांतिकारक तरुणाने अवघ्या 23 व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिले. आजच्या तरुणाने वेगवेगळ्या पक्षाची झेंडे हातात घेऊन न फिरता देशभक्तीचा अजेंडा घेऊन मिरवला पाहिजे. त्याचबरोबर आज विद्यार्थ्यांचा कल महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये जाऊन पुस्तके वाचण्यापेक्षा हातात मोबाईल घेऊन रिल्स बनवण्यात आहे, जो पुस्तक वाचतो त्याचं मस्तक कोणाच्याही अंकित नसते असे म्हणून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष भास्करदादा टोम्पे म्हणाले, आजचा तरुण हा दिशाहीन भटकतो आहे. त्याने आपले ध्येय निश्चित करून मार्गक्रमण केल्यास निश्चितच तो आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो असे म्हणून महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीवर लागलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी चांदूरबाजार पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव साहेब यांनीही विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे सेवन व कायदेविषयक बाबी संबंधी सविस्तर माहिती दिली. तसेच संस्थेच्या वतीने मागील वर्षभरात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीवर लागलेल्या एकूण 16 विद्यार्थ्यांचे त्यांच्या आई-वडिलांसहित शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मनीष सावरकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व आभार शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. अजित भिसे यांनी मानले. या कार्यक्रमाला वरिष्ठ, कनिष्ठ, डीएड, बीएड महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.