
मोर्शी / संजय गारपवार
पावसाळा सुरू झाला की विविध किटकजन्य आजारा मध्ये वाढ होते. त्यात प्रामुख्याने डासा पासून प्रसारीत होणारे आजार अधिक असतात. डासांचा डंख जरी छोटा असला तरी त्यापासून निर्माण होणारे धोके मात्र मोठे असतात. पावसाळ्याच्या हंगामात बहुतेकदा डास आणि कीटक वाढतात. याचा परिणाम लोकांना डेंग्यू सारखा धोकादायक आजार होतो. यामुळेच दरवर्षी १० ऑगस्टला ‘डेंग्यू प्रतिबंधक दिवस’ साजरा केला जातो. डेंग्यू हा आजार व्हायरसमुळे होतो, यालाच ‘डेन व्हायरस’ देखील म्हंटले जाते. डेंग्यू हा आजार ‘एडिस’ नावाच्या डासापासून होतो. या डासाच्याही दोन प्रजाती आहेत, एडीस इजिप्ताय आणि एडीस एल्बोपेक्टस. पावसाळ्यात ज्या ठिकाणी नेहमी पाणी साचते त्या ठिकाणी ‘एडीस’ सारख्या डासांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो, म्हणून आपण ज्या परिसरात राहतो तेथे या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याला डेंग्यू पासून काही धोका निर्माण होणार नाही.
*लक्षणे*
सर्दी, खोकला, सांधेदुखी, तीव्र ताप येणे. मळमळणं आणि उलट्या, पोट दुखणे, त्वचेवर व्रण उठणं.
*बचाव करण्यासाठी टिप्स*
साचलेलं पाणी बदलणे – कुलर, बादली आणि इतर भांड्यांमधील साचलेलं पाणी आठवड्यातून एकदा बदलावं. डेंग्यूचे डास साचलेल्या चांगल्या पाण्यामध्येही वाढतात. जर आपल्या घरात असं साचलेलं पाणी असेल तर डेंग्यूच्या डासांपासून वाचण्यासाठी पाणी बदलण्यासोबत, पाण्याच्या भांड्यावर झाकण ठेवणं आवश्यक आहे. हात-पाय झाकून ठेवणे – डेंग्यूच्या प्रसरणाचा सर्वात मोठा ऋतू म्हणजे पावसाळा. सर्वांनी असेच कपडे घालावेत ज्यानं आपले हात-पाय झाकले जातील आणि डासांना चावण्यासाठी जागा मिळणार नाही. तसंच डासांपासून बचाव करण्यासाठीचं क्रीमही आपल्या त्वचेवर लावणं उत्तम.रात्री मच्छरदाणीचा वापर करणे – रात्रीच्या वेळी डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. घरात डासांना पळवणाऱ्या स्प्रेचा सुद्धा वापर आपण करू शकतो. मात्र, ज्यांना असा स्प्रे वापरल्यास श्वास घेण्यास त्रास होतो, त्यांनी मच्छरदाणीचा वापर करणं जास्त चांगलं आहे.ओला-सुका कचरा वेगळा ठेवणे – घरात नेहमीच ओला सुका कचरा वेगळा ठेवावा. मात्र, पावसाळ्यात हे करणं अगदी आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात डेंग्यू पासून रक्षण करण्यासाठी डासांची ओल्या कचऱ्यामध्ये होणारी वाढ आपल्याला रोखता येईल.रुग्णांना सुरक्षित आणि मोकळं ठेवणे – डेंग्यू पासून बचाव करणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं डेंग्यू झालेल्या रुग्णाची काळजी घेणं होय. जर घरात डेंग्यूचा रुग्ण असेल तर त्याला चावलेला डास इतर कुणालाही चावू शकतो आणि त्यामुळं डेंग्यू पसरू शकतो, म्हणून रुग्णाची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार उपजिल्हा रुग्णालय मोर्शी यांनी केले आहे.