
ग्राहक संवाद आणि स्वच्छता मोहिम राबविण्याचे निर्देश
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
महावितरणचे मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी धारणी उपविभागाला भेट देऊन उपविभागातील वीज वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्यांचा तपास करून त्या वेळेत दूर करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी कार्यकारी अभियंता प्रदिप अंधारे , उपकार्य अभियंता श्याम एनंगटीवार आणि धारणी उपविभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी मुख्य अभियंता यांनी ३३ केव्ही धारणी उपकेंद्रांची पाहणी करून अखंडित व सुरळीत वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वेळोवेळी आवश्यक दुरुस्त्या व देखभाल कामे करण्यास सांगितले.नंतर धारणीतील थेट ग्राहकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वीज ग्राहकांना “महावितरण कार्यालयाच्या चकरा मारायला लागू नयेत, ही आपली प्राथमिक जबाबदारी समजून महावितरण सेवा ग्राहकाभिमूख करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करा.तसेच ग्राहकांनी वेळेवर वीजबिल भरले पाहिजे अशी संस्कृती निर्माण करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, गाडगेमहाराज स्वच्छता अभियानाअंतर्गत धारणी उपविभागीय कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. परिमंडळ कार्यालयाकडून कार्यालयाच्या पत्रानूसार प्रत्येक कार्यालय प्रमुखाने आपले कार्यालय आणि परिसराची नियमित स्वच्छता ठेवावी, असेही मुख्य अभियंत्यांनी आवाहन केले.