
स्वतःमध्ये माणुसकी जिवंत असणाऱ्यांनी परिवाराला न्याय मिळवून देण्यामध्ये वाटा द्यावा
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथील मृत व्यक्ति पुरूषोत्तम सुरेश चौधरी (वय ३७) हे शेतीच्या वहिवाट मार्गे घरी परतत असताना रानडुक्कर आडवे आल्याने गाडीचा अपघात झाला. व त्यामध्ये पायाला जखम झाली. उपचार करण्यामध्ये विलंब झाल्याने जखम थोडी मोठी झाली म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय (ईर्विन) अमरावती येथे ते गेले असता त्यांना भरती राहण्यास सांगितले. त्यांच्यामागे त्यांची सेवा सुश्रृषा करण्यासाठी त्यांच्या पत्नी व्यतिरिक्त जवळचे इतर कुणीही सुदृढ नातेवाईक नाही आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा लहान लहान तीन अपत्यांचा सांभाळ करावा लागतो. जवळपास महिनाभर त्यांना रुग्णालयातच भरती ठेवले तरि आराम काही पडला नाही. त्यांच्या समोर मागे त्यांच्या साध्या पत्नीशिवाय कुणी नाही हे रुग्णालयातील अमानुष अधिकारी कर्मचारी यांनी हि गोष्ट हेरली? आणि अचानक त्यांनी ऑपरेशन करण्यास सांगितले. ऑपरेशन ची पुरेपूर माहिती पत्नीला दिली नाही व तसेच आतमध्ये बघु सुद्धा दिले नाही. ऑपरेशन ला इतका वेळ का लागत आहे हे पत्नीने विचारले असता काहीही उत्तर दिले नाही. ऑपरेशन करून बाहेर आणल्यानंतर तबियत आणखीनच बिघडत होती. अशावेळी पुरुषोत्तम यांचे दात पाडून तोंडावाटे नळ्या सोडण्यात आल्या आणि पुरूषोत्तम सुरेश चौधरी हे खुप तडपून मरण पावले.पण यामध्ये एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली की ऑपरेशन करून आणल्यानंतर किडनी असते त्या ठिकाणी शस्त्रक्रियेचे टाके दिसले. ऑपरेशन पायाचे जखमेचे होते आणि सर्व सुदृढ असताना पोटावर टाके कसे? ही गोष्ट गावकऱ्यांच्या लक्षात येताच विचारपूस केली. तर त्यावर अशास्त्रीय उत्तर देण्यात आले की पोटातील हाड काढून पायात टाकण्यात आले. ही गोष्ट गावात पसरताच गावातील लोक तिथे जाऊन ठेपले आणि सर्व विचारपूस केली असता मृत पुरूषोत्तम यांची १००% किडनी काढल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. त्यानंतर प्रशासनावर थोडा दबाव आल्याने त्यांनी व्हिडिओ शुटिंग लावून कॅमेरा मध्ये शवविच्छेदन करतो असे सांगून तसे केले व जमलेल्या सर्वांना शांत केले आणि शव गावकऱ्यांना सुपुर्द केले व गावकऱ्यांनी गावात विधिवत अंत्यसंस्कार केले. आता शवविच्छेदनाचा अहवाल येईल आणि त्यावरून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले. परंतु ती शवविच्छेदनाची व्हिडिओ क्लिप त्यांच्याच कडे, शवविच्छेदनाचा अहवाल देणारे सुद्धा तेच किंवा त्यांचेच व्यक्तीसंबंध असताना सर्व काही प्रामाणिक, योग्य होईल आणि न्याय मिळेल ही अपेक्षाच करता येऊ शकत नाही.हे प्रकरण दडपविण्यासाठी वाटेल ते प्रयत्न सुद्धा होताना दिसत आहे. अधिकारी वर्गाशी वाटाघाटी करून पैसे खाण्याची सवय असणारे भाडखाऊ पुढारी किंवा प्रकरणात प्रत्यक्ष सहभागी असणारे व्यक्ती किंवा अप्रत्यक्ष सहभागी असणारे काही बडे पुढारी प्रकरण दडपविण्यासाठी आमिष व भिती दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु गरिबी आणि गरिब हे न कळणारे व्यक्ति, शासन, प्रशासन आणखी किती छळ करणार आणि अशी अमानुष कृत्ये करणाऱ्यांना पाठीशी घालणार आहे?या प्रकरणामध्ये कारवाई करणास अधिकार क्षेत्रात येत असणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा आमिष किंवा भिती दाखविली जाऊ शकते परंतु माणुसकी जिवंत असणारा व्यक्ती कशालाही न जुमानता न्यायाची बाजु घेईल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे सर्व पुढारी, समजदार लोक यांनी अतिशय गरिबीची परिस्थिती असणाऱ्या मृत पुरूषोत्तम यांच्या परिवाराला आर्थिक मदतीसोबतच न्याय मिळवून देण्यासाठी आपला वाटा द्यावा. पुरूषोत्तम हे मृत पावल्यानंतर त्यांची पत्नी व तीन अपत्य यांचा संसार उघड्यावर आहे आणि ना त्यांच्या कडे राहायला निट जागा, ना कसायला कोणतीही शेतजमीन आणि ना कोणतेही कायमस्वरूपी काम. समोर मागे कुणी नाही आणि गरिब व्यक्ती बघून किडनी काढण्याचा अमानुष प्रकार करुन खात्या पित्या माणसाचा जीव घेणाऱ्या संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून इतर कोणत्याही गरिब व्यक्ती वर अशी परिस्थिती ओढवू नये. यासाठी माणुसकी जिवंत असणाऱ्या सर्वांनी आपापल्या परिने प्रशासनाला जाब विचारावा, खालून वरपर्यंतच्या प्रशासनास निवेदन द्यावेत, निदर्शने व वेळ पडल्यास उपोषण करण्याची वेळ आल्यास ते ही करू आणि कोर्टात केस टाकायची असल्यास लोकवर्गणीतून प्रामाणिक वकिला मार्फत केस तयार करू, आपापल्या परिने जे होईल ते करावे, हे प्रकरण लावून धरावे आणि एका गरीब परिवाराला न्याय मिळवून द्यावा.