
जिल्हाधिकारी यांचे महसूल कर्मचाऱ्यांना आवाहन
महसूल दिनी डॉ. अविनाश सावजी यांचे मार्गदर्शन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा प्रशासनात महसूल विभागाकडून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी असंख्य योजना राबविण्यात येतात. त्यामुळे यंत्रणांकडे येणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांचे जीवन बदलण्याची क्षमता या विभागात आहे. त्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वस्थ जीवनशैली अनुसरून नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवावा,
असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.जिल्हा नियोजन सभागृहात महसूल दिनानिमित्त डॉ. अविनाश सावजी यांच्या मार्गदर्शनासह विविध लाभाचे वाटप करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, प्रसेनजित चव्हाण, श्रद्धा उदावंत, तिवसा उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे, जिल्हा सूचना अधिकारी मनिषकूमार, विधी अधिकारी ॲड. नरेंद्र बोहरा,तहसिलदार निलेश खटके प्रशांत पडघन आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी महसूल विभागात कार्य करीत असताना निश्चयाने कामे करावीत. नागरिकांच्या समस्यांसाठी महसूल विभागच त्यांना सहकार्य करू शकतो.
त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. कार्यालयीन कामकाज करताना शरीरश्रम होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी गावभेटी वाढवाव्यात. यामुळे गावातील नागरिकांशी संवाद वाढण्यास मदत होईल. नोकरीतील तणाव कमी करण्यासाठी कामांचा निपटारा रोज करावा. आपल्यावर नागरिकांच्या कल्याणाची जबाबदारी असल्यामुळे महसूल यंत्रणेने कणखर भूमिका ठेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.महसूल दिनानिमित्त स्वस्थ जीवनशैलीसाठी डॉ. अविनाश सावजी यांच्या ‘मानसिक ताणाव व्यवस्थापन’ यावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सर्वसामान्य नागरिक आणि कार्यालयीन कामकाज करणाऱ्यांसाठी डॉ. सावजी यांनी, विनाऔषधी आणि घरच्या चीज वस्तूंनी निरोगी आयुष्य जगणे शक्य आहे. यासाठी ताजा आणि स्वच्छ आहार घ्यावा. प्रक्रिया केलेले अन्न, रिफाइंड तेलाचा वापर टाळावा. तसेच शरीरश्रमासाठी एका जागेवर न बसता क्रियाशील असावे. यासोबतच सामाजिक वातावरणात वेळ घालविल्यास ताण कमी होतो, तसेच निवृत्तीनंतर ध्येय ठेवून त्यानुसार कार्य करावे.गेल्या दहा वर्षात सरासरी वजन दहा किलोने वाढले आहे. विविध आजारांचे कारण हे अनियंत्रित वजन असल्याने वजनावर नियंत्रण असावे. झोप हे सर्वात महत्वाची असून याकडे दुर्लक्ष करू नये. निरोगी आयुष्यासाठी पुरेसी झोप आवश्यक आहे. तसेच पांढरी साखर, तेल, मीठ, मैदा, बेकरी यापासून दूर राहावे. रंगीत फळे प्रतिकारशक्ती वाढवित असल्याने उपलब्ध फळांना महत्व देणे गरजेचे आहे. तेल आदी स्निग्ध पदार्थांचा उपयोग कमी करावा. यासोबतच कार्डीओ, स्ट्रेचिंग आणि मसल मजबूत करण्यासाठी व्यायाम करावा. संतुलित आहारासोबत ध्यान महत्वाचे आहे. स्वस्थ जीवनशैलीसाठी छंद जोपासणे, वेळेचा सदुपयोग करणे यासाठी प्रत्येकाने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी पारधी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र, मुख्यमंत्री सहायता निधी लाभाचे वाटप, फ्री होल्ड जमीनीचे प्रमाणपत्र वाटप, पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र, सातबारावर पत्नीचे नाव असणारे लक्ष्मी मुक्ती योजना, जिवंत सातबारा, संजय गांधी, श्रावणबाळ योजना, ई-शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. तसेच महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले. अनिल भटकर यांनी आभार मानले.