चांदूर रेल्वे / तालुका प्रतिनिधी
चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार श्री. विरेंद्र जगताप यांचे भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.

या विशेष प्रसंगी बाजार समितीचे सभापती श्री. गणेशभाऊ आरेकर, संचालक श्री. प्रभाकररावजी वाघ, श्री. अतुलभाऊ चांडक, श्री. सुभाषजी अग्रवाल आणि श्री. सुरेशराव जाधव यांनी जगताप यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन जंगी स्वागत केले.या स्वागत समारंभात बाजार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मा. विरेंद्रजी जगताप यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सभापती श्री. गणेशभाऊ आरेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले, “ विरेंद्रजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नवीन उंची गाठेल. त्यांचे शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी केलेले कार्य आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.” संचालक श्री. प्रभाकररावजी वाघ यांनी मा. जगताप यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करताना म्हटले की, “त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे परिसरातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बाजार समिती आणि काँग्रेस पक्ष एकत्रितपणे कार्य करेल.” श्री. अतुलभाऊ चांडक, श्री. सुभाषजी अग्रवाल आणि श्री. सुरेशराव जाधव यांनीही मा. जगताप यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विरेंद्रजी जगताप यांनी स्वागताला उत्तर देताना बाजार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि म्हणाले, “हे स्वागत माझ्या एकट्याचे नाही, तर चांदूर रेल्वेतील शेतकरी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचे आहे. मी माझ्या नवीन जबाबदारीतून समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करेन.” त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीच्या कार्याचे कौतुक केले आणि भविष्यात शेतकरी हिताच्या योजना संयुक्तपणे राबवण्याचे आश्वासन दिले.
