चांदूर बाजार / एजाज खान
टोम्पे महाविद्यालयातील करिअर मार्गदर्शन, प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलच्या वतीने संत नामदेव महाराज सांस्कृतिक सभागृहात शिकाऊ प्रोत्साहन योजना National Apprenticeship Training Scheme (NATS) विषयक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. राजीव बोरकर, संचालक, विद्यार्थी विकास विभाग, संगाबाअ विद्यापीठ हे होते तर प्रशिक्षक म्हणून श्री. विकासकुमार दमाहे, विभागीय व्यवस्थापक, CSC व प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा व संस्थापक अध्यक्ष श्री गोविंदराव टोम्पे याच्या प्रतिमेला हारार्पण करुन झाली.

प्रा. डॉ. उमेश कनेरकर, समन्वयक, प्लेसमेंट सेल यांनी कार्यक्रमाचे स्वरुप व आवश्यकता प्रस्तावने मधून मांडताना या उपक्रमाचे महत्व स्पष्ट केले. प्रा. डॉ. बोरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात अमरावती विद्यापीठा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विद्यार्थीनुकूल योजनांची सविस्तर माहिती दिली. या योजना विद्यार्थ्यांच्या रोजगाराभिमुख कौशल्य विकासासोबतच महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करून सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) च्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून अशा उपक्रमांचा पुरेपूर लाभ घ्यावा असे यावेळी त्यांनी आवाहन केले.या कार्यक्रमात श्री. विकासकुमार दमाहे, विभागीय व्यवस्थापक, CSC (NATS) यांनी या योजनेचे महत्त्व विषद करताना, शिक्षण व उद्योग यामधील दरी भरून काढण्यासाठी या प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी NEP 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्ये आत्मसात करण्याची गरज पटवून दिली व या संपूर्ण प्रक्रियेची माहिती व विद्यार्थ्यांनी नोंदणी कशी करावी याचे ऑनलाईन प्रात्यक्षिक करून दाखविले. प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि अशा संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.पाहुण्यांचा परिचय डॉ. मंगेश अडगोकर, महाविद्यालयीन समन्वयक, विद्यार्थी विकास विभाग यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्लेसमेंट सेलचे सहसमन्वयक डॉ. धनंजय बिजवे यांनी केले तर प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाणे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये करिअर विषयक योजनांची माहिती पोहचविण्यास आणि येणाऱ्या काळात कौशल्य विकासासाठी प्रेरणा देणारा ठरला.
