
दर्यापूर येथील न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे भारतीय संविधानाचे आणि लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. या संविधानाचे अभिप्रेत मूल्य टिकविण्यासाठी न्याय व्यवस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. दर्यापूर येथील न्यायमंदीर, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय, वरिष्ठस्तर या नूतन न्यायालयीन इमारतीच्या कोनशीलेचे अनावरण आज सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरन्यायाधीशांनी इमारतीची पाहणी केली.या उद्घाटन सोहळ्याला खासदार बळवंत वानखडे, आमदार गजानन लवटे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रवीण पाटील, दर्यापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष धमेंद्र आठवले, जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा तसेच दर्यापूर जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यवान डोके आदी यावेळी उपस्थित होते.
सरन्यायाधीश न्या. भूषण गवई म्हणाले, दर्यापूर येथील न्याय मंदीराचे उद्घाटन ही घटना माझ्यासाठी विशेष आनंदाची आहे. मी मूळचा दारापूरचा असल्यामुळे माझ्यासाठी ही अभिमानाची व समाधानाची बाब आहे. मी या कार्यक्रमाला सरन्यायाधीश म्हणून आलो नसून एक ग्रामस्थ म्हणून आलेलो आहे. या नवीन न्यायालयीन इमारतीमुळे तसेच सुसज्ज यंत्रणेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना लवकर न्याय मिळेल. न्यायदानाचे कार्य कोणताही पूर्वग्रहदूषित भाव न बाळगता करावे लागते, म्हणून खऱ्या अर्थाने हे एक पवित्र कार्य आहे. दर्यापूर तालुक्याने आजवर अनेक नामवंत व्यक्ती दिल्या आहेत. यामुळे हा तालुका सदैव अग्रेसर राहिलेला आहे. न्याय व्यवस्था ही लोकशाहीचा प्राण आहे. यामुळे संविधानाला आदर्श मानून न्यायदानाचे कार्य करावे. या क्षेत्रात अनुभव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
न्यायाधीश आणि वकील यांचे संबंध सलोख्याची असावे. शासनाने अनेक महत्त्वपूर्ण कायदे लागू केले आहेत. महिला सबळीकरण कायद्यान्वये स्त्रियांना त्यांचा हक्क मिळत आहे. उत्तम न्याय व्यवस्थेमुळे आज आपला देश प्रगतीपथावर आहे. राज्यघटनेचे मौलिक अधिकार आणि जबाबदारी याचे योग्य पालन होणे गरजेचे असल्याचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यावेळी म्हणाले.दर्यापूर सत्र न्यायालय कार्यक्षेत्रात दर्यापूर व अंजनगाव ही कार्यक्षेत्र येतात. या नूतन इमारतीमध्ये दर्यापूर आणि अंजनगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयाची प्रकरणे (दिवाणी व फौजदारी )या न्यायालयात चालतील. २८.५४ कोटी रुपये निधी खर्चून या सुसज्ज आणि भव्य इमारतीचे बांधकाम करण्यात आले. न्यायमंदीराची इमारत चार मजली असून तळमजल्यावर पार्किंग, तीन मजल्यांवर ५ न्यायालय कक्ष, इतर विभाग व एक सभागृह आहे. प्रत्येक मजल्यावर पक्षकार व आरोपींना बसरण्याची सुविधा आहे. अद्यावत संगणक कक्ष व सर्व्हर रुम आहेत. इमारतीच्या मागील बाजूस पार्किंगमधून रॅम्पची सुविधा आहे. नवीन न्यायालयीन इमारतीमुळे परिसरातील नागरिकांना न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक सुकर होईल.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. यार्लगड्डा यांनी केले. संचालन न्यायाधीश हितेश सोनार आणि न्यायाधीश रोहिणी मनोरे यांनी केले तर आभार अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यवान डोके यांनी मानले.