
आ.उमेश यावलकर यांच्या पाठपुराव्याला यश !
मोर्शी / संजय गारपवार
पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत सन २०२५/२६ च्या वार्षिक आराखड्यानुसार वरूड मोर्शी विधानसभा क्षेत्रातील सात ग्रामपंचायतींना नवीन इमारत व नागरी सुविधा केंद्र बांधकामासाठी राज्य सरकारने नुकतीच मंजुरात दिली आहे. त्यामुळे लवकरच या ग्रामपंचायतींना आपले हक्काचे नवीन ग्रामपंचायत भवन मिळणार आहे. ज्या ग्रामपंचायतीना स्वमालकीची इमारत नाही, ज्या इमारती जिर्ण अवस्थे आहे, ज्या धोकादायक परिस्थितीत व मोडकळीस आलेल्या आहे अशा ग्रामपंचायत इमारतींचे प्रस्ताव आ.उमेश यावलकर यांच्या मार्फत शासन स्तरावर पाठवण्यात आले होते. त्यातील पहिल्या टप्प्यात सात ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी शासनाने नुकतीच मंजुरात दिली आहे. यामध्ये इमारत बांधकामासाठी २० लक्ष व नागरी सुविधा खोली बांधकामासाठी ५ लक्ष असे एकुण प्रत्येकी २५ लक्ष रूपये निधी प्राप्त होणार आहे. मतदार संघातील इतर ग्रामपंचायती सुद्धा प्रक्रियेत असून त्याला सुद्धा लवकरच ग्राम विकास विभागातर्फे मान्यता मिळणार असल्याचे आ. उमेश यावलकर यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील एकूण २१ ग्रामपंचायतींना उपरोक्त निधी मिळणार असून त्यापैकी वरूड मोर्शी तालुक्यातील एकुण सात ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यामध्ये मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर, गणेशपुर व वरूड तालुक्यातील राजुरा बाजार, बेनोडा, लोणी, शहापूर, टेंभुरखेडा या ग्रामपंचायतीचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. यासह राज्यस्तरावरील बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत भवन उभारणी योजने अंतर्गत वरूड मोर्शी विधानसभा श्रेत्रातील अन्य ग्रामपंचायत इमारती बांधकाम मंजुरीचा प्रस्ताव सुद्धा प्रक्रियेत आहे. टप्प्याटप्प्याने मतदार संघातील ज्या ग्रामपंचायतींना हक्काचे कार्यालय नाही किंवा ज्या ग्रामपंचायतींच्या इमारती जीर्ण व मोडकळीस आलेले आहेत त्यांचा प्रामुख्याने या योजनेत समावेश होणार आहे. याबाबत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आ.यावलकर यांनी सांगितले आहे. मतदार संघातील ग्रामपंचायत बांधकामाकरिता निधी मंजूर करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आ. उमेश यावलकर यांनी आभार व्यक्त केले आहे.