
५ कि.मी.चा खड्डेमय रस्ता दोन दिवसात बुजवून गावासाठी उभारला आदर्श
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खेड़ पिंपरी गावातील युवकांनी आपल्या कष्टातून एक असामान्य आणि प्रेरणादायी कामगिरी करत शासनाला लाजवणारा आदर्श उभा केला आहे. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापड या गावापर्यंतचा ५ कि.मी. अंतराचा रस्ता पूर्णतः खड्ड्यांनी भरलेला असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्याकडे जी. परिषद अमरावती व स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत.
या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले असून, आजारी नागरिकांना दवाखान्यात जाण्यास मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.अपघातांची शक्यता वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे.या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांनी ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार व पत्रव्यवहाराद्वारे गेल्या दोन वर्षांत जिल्हा परिषद अमरावती आणि आमदार प्रताप अडसड यांच्याकडे अनेक वेळा मागणी केली.मात्र केवळ आश्वासने मिळाली व प्रत्यक्षात कोणतीच कारवाई झाली नाही.या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ युवकांनी पुढाकार घेत पावसात भिजत मोठ्या खड्ड्यांत मुरूम भरून फक्त दोन दिवसांत ५ कि.मी.चा रस्ता तात्पुरता दुरुस्त केला. या श्रमदानासाठी मोफत ट्रॅक्टरची व्यवस्था गावातील प्रतिष्ठित नागरिक दिनेश महादेव गिरी यांच्या सौजन्याने करण्यात आली.या श्रमदान मोहिमेत शुभम पा. बोदडे, ईश्वर ना. विटकरे, आकाश ना.भोंडे,रूपेश राऊत, विजय सं.चौधरी,अंकुश र. जाधव,ट्रॅक्टर चालक नाना राऊत,राहुल जाधव,सरपंच मंगेश कांबळे आणि इतर युवकांनी उल्लेखनीय सहभाग घेतला.या कार्यामुळे संपूर्ण ग्रामस्थ व विद्यार्थीवर्गाला मोठा दिलासा मिळाला असून युवकांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामपंचायतमार्फत १५ ऑगस्ट रोजी श्रमदानात सहभागी प्रत्येक व्यक्तीचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच मंगेश कांबळे यांनी दिली.त्याचबरोबर दिलेल्या आश्वासनानुसार आमदार प्रताप अडसड यांनी त्वरित रस्ता दुरुस्ती करून द्यावी अन्यथा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान ग्रामस्थांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सरपंचांनी दिला आहे.