
ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ढवलसर गटग्रामपंचायत खेड पिंपरी अंतर्गत येणाऱ्या ढवलसर गावात गेल्या काही काळापासून सुरू असलेली भीषण पाणीटंचाई अखेर सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या अथक प्रयत्नामुळे दूर झाली असून ग्रामस्थांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शासनामार्फत ढवलसर गावात योग्य पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नव्हती.
ग्रामपंचायतीने यापूर्वी एक बोरवेल खोदले होते मात्र ती बोरवेल काही काळानंतर निकामी झाली. त्यानंतर खासगी विहिरीवरून काही प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येत होता, परंतु तोही ५ ते ६ दिवसांच्या अंतराने होत असल्याने ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.या समस्येबाबत ग्रामस्थांनी सरपंच मंगेश कांबळे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी तातडीने या विषयाला गांभीर्याने घेतले. प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने आणि मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न होत असल्याने सरपंचांनी हार न मानता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पर्याय शोधण्यास सुरुवात केली.शासनाकडून येणारा अत्यल्प निधी लक्षात घेता पाईपलाईन ऐवजी विहीर खोदकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला.या कामासाठी १५ व्या वित्त आयोगातून ३,७२,००० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर बांधकामासाठी ग्रामपंचायतीच्या निधीतून ३,४२,००० रुपये वापरून विहिरीचे काम पूर्ण करण्यात आले. सौभाग्याने विहिरीस भरपूर पाणी लागले असून त्यामुळे ढवलसर गावाची पाणीटंचाई कायमची दूर होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या प्रकल्पानंतर विहिरीपासून पाण्याची टाकी आणि पाईपलाईन टाकण्यासाठी निधीची आवश्यकता भासू लागली. या अडचणीसह जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाठपुरावा करून ७,००,००० रुपयांचा निधी उपलब्ध करून घेण्यात आला असून, पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच सरपंच मंगेश कांबळे व उपसरपंच सुधीर देवतळे यांच्या हस्ते करण्यात आला. भूमिपूजन करून काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.सरपंच मंगेश कांबळे यांनी सांगितले की शासनाकडून केवळ प्रशिक्षण पुरविले जाते मात्र प्रत्यक्षात आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांसाठी फारसा निधी मिळत नाही.त्यामुळे ग्रामपंचायतीला स्वतःच्या मर्यादित निधीतूनच हे कार्य पार पाडावे लागते ही लाजीरवाणी बाब आहे.ढवलसर ग्रामस्थांनी सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या कामाची प्रशंसा करत समाधान व आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे अखेर गावातील पाणीटंचाई दूर होत असून हे कार्य प्रेरणादायक ठरत आहे.