
पर्यावरणाशी जपली बांधिलकी
मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांची माहिती
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नगरपंचायत कार्यालय नांदगाव खंडेश्वर यांच्यातर्फे सर्व शहरवासीयांसाठी वृक्ष दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे . या योजनेच्या माध्यमातून नगरपंचायत तर्फे मागणी केल्यानुसार नागरिकांना एक झाड दत्तक म्हणून दिले जाणार आहे . या झाडाचे संगोपन ही संबंधित नागरिकांची जबाबदारी असणार आहे.
पर्यावरण संरक्षणासाठी सामाजिक सहभाग वाढावा यासाठी मुख्याधिकारी श्री निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर यांनी ही योजना राबविली आहे . या योजनेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती वाढावी आणि पर्यावरणाप्रती संवेदनशीलता निर्माण व्हावी असा प्रयत्न असल्याचे मुख्याधिकारी श्री. निवृत्ती भालकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले . वर्षभर झाडांची योग्य काळजी घेणाऱ्या नागरिकांना नगरपंचायत सन्मानित करणार आहे . या योजनेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून वाढणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर उपाय म्हणून आपले नैतिक कर्तव्य पार पाडावे , असे आवाहन मुख्याधिकारी निवृत्ती भालकर व सर्व नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे .