नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
मुंबई / प्रतिनिधी
पूर्व विदर्भातील मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात सभागृहात विषय मांडला होता.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूरस्थितीमुळे काही प्रवासी एस.टी.मध्ये अडकले होते. त्यांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले होते. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूपपणे घरी पाठवण्यात आले आहे.

गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग बंद असून, पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे. गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे गडचिरोलीपर्यंत सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नागपूर शहरातील सखल भागांत पाणी साचले यावर संबंधित यंत्रणेचे पूर्ण लक्ष आहे.नागरिकांसाठी बचाव कार्य सुरू आहे. या पूरस्थितीत एक व्यक्ती वाहून गेल्याचीही माहिती मिळाली आहे. याठिकाणी एसडीआरएफ आणि एनडीआरए यांना सज्ज ठेवले आहे. आजही नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्याने संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी असे, आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

