
नांदगावचें वाहन उपविभागीय कृषी अधिकारी*यांच्या दिमतीला
गेल्या सात वर्षांपासून वापर; टी.ए.ओ.आहेत बिना वाहनाविना
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तालुका कृषी विभागाच्या कारभारात गंभीर विसंगती उघडकीस आली आहे.उपविभागीय कृषी अधिकारी अमरावती,श्री.पंकज चेळे हे गेल्या सात वर्षांपासून बळजबरीने आपल्या पदाचा वापर करून नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे चारचाकी वाहन स्वतःच वापरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.नांदगाव खंडेश्वर हा अमरावती जिल्ह्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका असून तालुक्यात १६१ गावांमध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांना नियमितपणे भेटी देणे आवश्यक असते.मात्र त्यांना चारचाकी शासकीय वाहन उपलब्ध नसल्याने तालुका कृषी अधिकारी यांना मोटारसायकलवरच दौरे करावे लागत आहेत.यामुळे त्यांची शारीरिक दमछाक होत असून,शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांना शासकीय वाहन नसल्याने वेळेवर दौऱ्याच्या ठिकाणी पोहोचणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांच्या रोशास त्यांना सामोरे जावे लागत आहे.चारचाकी वाहनाचा वापर हा संबंधित तालुका कृषी कार्यालयाच्या सेवेसाठी असताना आणि राज्य शासनाने तालुका कृषी अधिकारी याना शासकीय वाहन उपलब्ध करून दिले असताना ते शासकिय वाहन उपविभागीय कृषी अधिकारी हे आपल्या पदाचा दुरुपयोग करून अमरावती कार्यालयाकरिता वापरत आहेत.त्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांची कृषीविषयक कामे व शेतकऱ्यांशी संपर्क करताना त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देन्याची गरज आहे. नांदगाव खंडेश्वर येथील तालुका कृषी अधिकारी यांचे शासकीय वाहन पुन्हा तालुका कार्यालयाकडे परत मिळवून देण्यात यावे आणि दोषी अधिकाऱ्यावर अनुशासनात्मक कारवाई करण्यात यावी,तसेच येत्या आठ दिवसांत हे वाहन तालुका कार्यालयास उपलब्ध करून न दिल्यास तालुक्यातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.