
जमावबंदी आयुक्तांनी जारी केले परिपत्रक
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
अनेक शासकीय कार्यालयात सहकारी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वाढदिवस केक कापून साजरे केले जातात. मात्र, या वाढदिवसाच्या वेळेतच कामानिमित्त शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना ताटकळत बसावे लागते. हा प्रकार बंद करण्यासाठी जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ नुसार अशा प्रकारचे वैयक्तिक समारंभ साजरे करू नयेत, अशा लेखी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये हे चित्र पाहावयास मिळते.
शासकीय कार्यालयातील काही उत्साही कर्मचारी मंडळी, संघटनेचे पदाधिकारी आपल्या अधिकारी, तसेच सहकारी कर्मचारी यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी जोडण्या घालत असतात. केक कापून तो सर्व विभागांत केक व पेढे वाटतात. काही वेळा भाषणे होतात; परंतु या प्रकारामुळे शासकीय कामकाज मात्र काही वेळ थांबते. अशातच कामासाठी येणारे नागरिकही ताटकळत बसतात. या पार्श्वभूमीवर राज्याचे जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयात आणि अधिनस्त कार्यालयांमध्ये कामकाजाच्या वेळेत वैयक्तिक समारंभ साजरे केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा या पत्रात दिला आहे.
या पत्राची इतर विभागांत चर्चा
राज्याच्या जमावबंदी आयुक्त यांनी २३ जून रोजी काढलेल्या आपल्या अधिनस्त असलेल्या शासकीय कार्यालयात वैयक्तिक समारंभ साजरे न करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. हे परिपत्रक सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे इतर विभागात वैयक्तिक समारंभ साजरे करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्येही या पत्राची जोरदार चर्चा रंगत आहे.
👍