
परिसरातील त्रस्त नागरिकांची वरीष्ठांकडे तक्रार, मात्र अद्यापही कारवाई नाही
अंजनगाव बारी/ पवन इंगोले
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित बडनेरा (ग्रामीण) उपविभाग अंतर्गत येणाऱ्या विज वितरण केंद्र ३३/११ के. व्ही. उपकेंद्र अंजनगाव बारी येथील कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेले अंकुश सोनोने यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून परिसरातील नागरिकांनी वरीष्ठांकडे तक्रार दाखल केली आहे मात्र कनिष्ठ अभियंत्यावर अद्यापही कोणतीही कारवाई न झाल्याने परिसरातील नागरिक संभ्रमात आहेत. अंजनगाव बारी वितरण केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या मांजरी म्हसला येथील ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार कनिष्ठ अभियंता अंकुश सोनोने यांना वीज संदर्भातील कुठलेही तक्रार कॉल द्वारे कळविण्यात आली असता त्या तक्रारीचा प्रतिसाद मिळत नाही तसेच त्या तक्रारी संदर्भात फोन कॉल केले असता कार्यालयीन वेळेत कॉल करायचा असे नियम त्यांच्या कडून सांगण्यात येतात.
तसेच गावात वीज बिल वसुलीसाठी आले असता महिलांशी हुज्जत घालणे, अपशब्द बोलणे, महिलांशी गैरवर्तणूक करणे, दबाव टाकणे हा प्रकार जास्त प्रमाणात वाढत असून अंकुश सोनवणे यांच्यावर योग्य त्या वेळेत योग्य त्या वेळी आपण प्रतिबंध टाकून अशा अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवरणे तसेच त्यांच्या अशा वागणुकीची माहिती आपल्याला लेखी स्वरूपात कळविणे आमची सर्व ग्राहकांची जबाबदारी असल्याचे तक्रारकर्त्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कनिष्ठ अभियंता हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून ग्राहकांची समस्या सोडविण्यात असमर्थ असून ग्राहकांची समस्या वाढविण्याचे काम करीत आहे. सर्व कामे मी शासनाच्या प्रोटोकॉल नुसार करत आहे असे वारंवार सांगणारे कनिष्ठ अभियंता मात्र आपल्या मुख्यालयात न राहता परिवारासोबत अमरावती शहरात राहत असल्याची गंभीर बाब उघडकीस आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आपल्या महामंडळाची दिशाभूल करणा-या कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करून या संदर्भात संपूर्ण प्रकरणाचा अहवाल वरीष्ठ सहायक अभियंता बडनेरा रेल्वे यांच्या मार्फत मागविण्यात यावा व संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही परिसरातील नागरिकांनी केली आहे.