दोन महिने सभेचे इतिवृत्त रखडले;विकासकामांना खीळ बसल्याचा आरोप
मुदतीत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीतील प्रशासकीय कारभारावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून नव्हे, तर सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधींकडूनच मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने नगर पंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे.
२२ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त (प्रोसीडिंग) तब्बल दोन महिने उलटूनही पूर्ण करण्यात आले नसल्याचा आरोप करीत उपनगराध्यक्ष अब्दुल जमीर यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांना थेट २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. निर्धारित वेळेत इतिवृत्त पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाईची मागणी करण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे देण्यात आला आहे.

नगर पंचायतीच्या २२ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन अनेक ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले होते. मात्र, सभा होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी सभेचे इतिवृत्त अद्याप पूर्ण झाले नसल्याचे सत्ताधारी सदस्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ८१ नुसार सभेचे इतिवृत्त नियमानुसार नोंदवून पुढील कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. असे असताना इतिवृत्ताची नोंदवही अपूर्ण राहणे ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नसून नगर पंचायतीच्या कामकाजावर परिणाम करणारी गंभीर बाब असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधींनी सभागृहात जनतेच्या प्रश्नांसाठी मांडलेले विषय आणि बहुमताने मंजूर केलेले विकासकामांचे ठराव प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तत्परता दाखविणे अपेक्षित असते. मात्र, सभेचे इतिवृत्तच पूर्ण झाले नसल्याने मंजूर ठरावांच्या पुढील कार्यवाहीला अडथळे निर्माण होत असल्याचा दावा सत्ताधारी सदस्यांनी केला आहे. शहरातील विकासकामे मार्गी लावण्याऐवजी कागदोपत्री प्रक्रियेतच प्रशासन अडकले असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडायच्या, असा सवालही उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे,या प्रकरणात सत्ताधारी गटाने घेतलेली आक्रमक भूमिका राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. नगर पंचायतीमध्ये लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना दोन महिने इतिवृत्त प्रलंबित राहणे म्हणजे लोकप्रतिनिधींच्या अधिकारांनाच प्रशासकीय दिरंगाईचा अडथळा निर्माण झाल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली आहे.उपनगराध्यक्ष अब्दुल जमीर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी पत्रातून आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. पुढील २४ तासांच्या आत २२ सप्टेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त नियमानुसार पूर्ण करून आवश्यक स्वाक्षऱ्यांसाठी सादर करावे,अशी मागणी करण्यात आली आहे. या मुदतीत कार्यवाही न झाल्यास कर्तव्यात कसूर आणि प्रशासकीय दिरंगाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार करून शिस्तभंगविषयक कारवाईची मागणी करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.या पत्रावर उपनगराध्यक्ष अब्दुल जमीर अब्दुल रहीम, सार्वजनिक बांधकाम सभापती मोहम्मद रियाज मोहम्मद मुमताज, महिला व बालकल्याण उपसभापती शिला अरुण वाडेकर,स्वीकृत नगरसेवक मोहम्मद साजिद मोहम्मद शब्बीर,नगरसेविका रजियाबी अब्दुल सलाम,आसिया शेख जमील शेख,अलमास बी.शेख हारून आणि प्रांजली राहुल गुल्हाने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.सामान्यतः सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात समन्वयातून नगर पंचायतीचा कारभार चालणे अपेक्षित असते. मात्र, याच सत्ताधारी गटाला मुख्याधिकाऱ्यांविरोधात लेखी अल्टिमेटम देण्याची वेळ आल्याने प्रशासकीय समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे प्रशासन कितपत गांभीर्याने पाहते आणि शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी किती तत्परता दाखवते, याची आता परीक्षा लागली आहे. मुख्याधिकारी २४ तासांच्या मुदतीत इतिवृत्त पूर्ण करतात की सत्ताधारी सदस्य प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करतात, याकडे नांदगाव खंडेश्वर शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर झालेले ठराव हे जनतेच्या विकासाशी निगडित आहेत. मात्र, दोन महिने उलटूनही सभेचे इतिवृत्त पूर्ण न होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे शहराच्या विकासकामांना अडथळा निर्माण होणे कदापि खपवून घेतले जाणार नाही. मुख्याधिकाऱ्यांनी २४ तासांच्या आत इतिवृत्त पूर्ण करावे. अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल.
– मो. साजिद मो. शब्बीर
पक्षनेता तथा स्वीकृत नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)
