धामक येथे कार्तिक पौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात थाटात संपन्न
नांदगाव खंडेश्वर / पवन ठाकरे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली धार्मिक परंपरा कायम राखत यंदाही श्री संत गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा व कार्तिक पौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या महोत्सवानिमित्त सलग सात दिवस गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. दररोज सकाळी काकड आरती, दुपारी मंगेश महाराज ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन सेवा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जणू काही संपूर्ण गावात भक्तीची दिवाळीच साजरी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे आचार्य बालयोगी परमपूज्य स्वामी गजेंद्र चैतन्य महाराज यांच्या सुमधुर वाणीतून सात दिवस श्री संत गजानन महाराज जीवनचरित्र कथेचे निरूपण करण्यात आले. यावेळी महाराजांनी गजानन महाराजांच्या जीवनातील भक्तिमार्ग, कर्ममार्ग आणि सेवाभावाचे महत्त्व विशद करत भक्तांनी निःस्वार्थ भावनेने सेवा करावी, असा संदेश दिला. त्यांच्या अमृततुल्य प्रवचनाचा लाभ परिसरातील हजारो भाविकांनी घेतला.

महोत्सवानिमित्त गावातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी घरोघरी आकर्षक रांगोळ्या काढून पालखी व ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. महिला भजनी मंडळासह गावातील नागरिक, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने या नगरप्रदक्षिणेत सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि गजानन महाराजांच्या जयघोषात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ह.भ.प. पुंडलिक महाराज मास्कर, शेगाव यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या अन्नदाते, देणगीदार, दानदाते व सेवाभावी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्याला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांच्या सहकार्यामुळे महोत्सव यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त मंडळ व सेवाधारी मंडळाच्या वतीने देण्यात आली.
