महाराष्ट्रातील समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ सेवाशाश्वतीच्या प्रतीक्षेत;अल्प वेतन आणि कंत्राटी नियुक्त्यांचा फटका
महाराष्ट्रातील एड्स प्रकल्पातील 1800 कर्मचाऱ्यांचे काय? स्वतंत्र धोरणाची मागणी
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
सरकारी आरोग्य योजनांच्या यशामागे वर्षानुवर्षे योगदान देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सेवा देणारे समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ आजही सेवाशाश्वतीच्या प्रतीक्षेत आहेत. अत्यल्प वेतन,वार्षिक कराराचे नूतनीकरण,वेतनवाढीतील अनिश्चितता आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वाढते वय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या असतानाही नोकरीच्या स्थैर्याची हमी नसल्याने त्यांचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून राज्यभर DAPCU, ICTC, ART, गुप्तरोग केंद्रे, रक्तपुरवठा केंद्रे तसेच सिफिलीस व हेपेटायटीससारखे आरोग्यविषयक उपक्रम राबविले जातात. यामध्ये समुपदेशक एचआयव्ही तपासणीबाबत जनजागृती करणे,नागरिकांचे गैरसमज दूर करणे,गोपनीयता राखणे आणि पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारांशी जोडण्याचे काम करतात. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ अचूक तपासण्यांद्वारे निदान प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात.मात्र कामाची उद्दिष्टे आणि अहवालांचा हिशेब मागितला जात असताना वेतनवाढ,विमा आणि सेवाशाश्वतीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्याच्या ठरावीक लक्ष्यांचा दबाव समुपदेशकांवर असतो. प्रत्यक्षात एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ठरणे हे कर्मचाऱ्यांच्या हातात नसते. त्यामुळे केवळ आकडेवारीपेक्षा नवीन संसर्ग रोखणे, वेळेवर निदान करणे आणि रुग्णांना उपचारांशी जोडणे याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या यशाची जबाबदारी सर्व प्रशासकीय स्तरांवर असताना लक्ष्यपूर्तीचा जाब केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाच विचारणे कितपत योग्य, असा प्रश्न महाराष्ट्रातील एड्स नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

दरम्यान राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (NHM) कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२४ रोजी दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय काढला.त्यात ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सुधारणा करण्यात आली. त्यानंतर ३० जून २०२६ रोजी २५ जून २०२६ पर्यंत तांत्रिक खंड वगळून दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी वार्षिक १ हजार १५३ कोटी ६० लाख रुपयांच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. मात्र महाराष्ट्रातील एड्स नियंत्रण कार्यक्रमात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या 1800 कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न अद्याप कायम आहे.केंद्र सरकारने २० मार्च २०२६ रोजी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती संबंधित राज्य एड्स नियंत्रण संस्थांकडून केली जाते. त्यांचा करार सामान्यतः एक वर्षाचा असतो, तर वेतनाचे पुनरावलोकन पाच वर्षांच्या टप्प्याने केले जाते. त्यामुळे वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. नियमितीकरणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.त्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधी,अनुभव आणि पात्रता लक्षात घेऊन स्वतंत्र धोरण आखण्याची गरज आहे.याशिवाय बाह्यस्रोत पद्धतीने मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या धोरणामुळेही महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. NHM च्या ३० जून २०२६ च्या शासन निर्णयात भविष्यातील मनुष्यबळ बाह्यस्रोत किंवा सेवा कराराद्वारे घेण्याची तरतूद आहे. अशा नियुक्त्यांमध्ये वेळेवर वेतन, भविष्य निर्वाह निधी (PF), आरोग्य विमा,ग्रॅच्युइटी आणि अपघाती संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे.महाराष्ट्र शासनाने एड्स नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांची संख्या,सेवा कालावधी, वेतन आणि नियुक्तीचे स्वरूप यांची माहिती सार्वजनिक करावी.दहा वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी अनुभवाच्या आधारे समायोजनाचे धोरण, न्याय्य वेतनवाढ आणि सामाजिक सुरक्षेची हमी देणारी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी. पाच वर्षांनी होणाऱ्या वेतन पुनरावलोकनातील अनिश्चितता दूर करून नियमित वेतनवाढीची व्यवस्था करावी. PF, विमा, ग्रॅच्युइटी व अपघाती संरक्षण प्रत्यक्ष मिळत असल्याची खात्री करावी,तसेच लक्ष्यपूर्तीची जबाबदारी वरिष्ठ अधिकारी व प्रशासकीय यंत्रणेवरही निश्चित करावी,अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील एड्स नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे.महाराष्ट्र राज्यात दोन दशकांहून अधिक काळ आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आजही स्वतःच्या भविष्याची चिंता करावी लागत असेल,तर ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. रुग्णांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वतःचे भविष्यही सुरक्षित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने स्वीकारावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्यातील एड्स नियंत्रण कार्यक्रमात समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक उद्दिष्टपूर्तीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आजही नोकरीच्या स्थैर्याची आणि भविष्याची चिंता सतावत आहे. NHM कर्मचाऱ्यांप्रमाणे एड्स प्रकल्पातील पात्र कर्मचाऱ्यांचाही महाराष्ट्र शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून सेवाशाश्वती,न्याय्य वेतनवाढ,आरोग्य विमा आणि सामाजिक सुरक्षेची हमी द्यावी. त्यांच्या दीर्घ सेवेचा आणि अनुभवाचा सन्मान राखत शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा.
— प्रमोद मिसाळ,राज्य कृती समिती सदस्य,एड्स नियंत्रण कर्मचारी संघटना म. रा.
