कधीकाळी रंगीबेरंगी फुले, कमळांचे तळे आणि बदकांच्या विहाराने बहरलेला परिसर आज भकास
दूरवरून येणाऱ्या भाविकांचे आकर्षण ठरलेला बगीचा आता दुर्लक्षित; मंदिर विश्वस्त मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील ऐतिहासिक खंडेश्वर मंदिर परिसरातील एकेकाळचा सुंदर, निसर्गरम्य आणि मनमोहक बगीचा आज पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत पोहोचला आहे. कधीकाळी विविध प्रकारच्या हिरव्यागार झाडांनी,रंगीबेरंगी फुलांनी आणि आकर्षक नैसर्गिक सौंदर्याने बहरलेला हा बगीचा आज उजाड स्वरूपात दिसत असून, त्याची अवस्था पाहून भाविक आणि नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही वर्षांपूर्वी या बगीच्याचे सौंदर्य पाहण्यासाठी दूरदूरवरून भाविक आणि पर्यटक मंदिर परिसरात येत असत. बगीच्यामध्ये विविध प्रकारची शोभेची झाडे, आकर्षक फुलझाडे,सुंदर कारंजे आणि कमळाच्या विविध प्रकारच्या फुलांनी सजलेले तळे होते. त्याचबरोबर या परिसरात मोठ्या प्रमाणात बदके विहार करत असल्याने बगीच्याच्या सौंदर्यात आणखी भर पडत होती. हिरवाईने नटलेला परिसर, फुलांचा सुगंध, पाण्याचा खळखळाट आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे येथे अत्यंत प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते.मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक काही वेळ या बगीच्यामध्ये घालवत असत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हा परिसर आकर्षणाचे केंद्र होता. मंदिराच्या धार्मिक महत्त्वासोबतच या बगीच्यामुळे खंडेश्वर मंदिराच्या सौंदर्यात विशेष भर पडली होती. त्यामुळे हा बगीचा मंदिर परिसराची एक वेगळी ओळख बनला होता.

मात्र,काळाच्या ओघात या सुंदर बगीच्याची देखभाल आणि संवर्धनाकडे दुर्लक्ष होत गेले. नियमित स्वच्छता, झाडांची निगा, फुलझाडांची लागवड, कारंज्याची देखभाल आणि परिसराचे सुशोभीकरण याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याचे दिसून येते. परिणामी, एकेकाळी हिरवाईने बहरलेला हा परिसर आज उजाड आणि भकास झाला आहे.ज्या ठिकाणी पूर्वी निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी भाविकांची वर्दळ असायची, त्याच ठिकाणी आज बगीच्याचे अस्तित्वच हरवत चालले आहे.विशेष म्हणजे, मंदिर परिसराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता या बगीच्याचे जतन आणि संवर्धन करणे ही मंदिर प्रशासन व विश्वस्त मंडळाची महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र, विश्वस्त मंडळाच्या दुर्लक्षामुळे आणि देखभालीअभावी या सुंदर बगीच्याची अशी दयनीय अवस्था झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.खंडेश्वर मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अशा वेळी मंदिर परिसर स्वच्छ,सुंदर आणि निसर्गरम्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिर विश्वस्त मंडळाने या बगीच्याची प्रत्यक्ष पाहणी करून त्याच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने पुढाकार घ्यावा.नव्याने वृक्षारोपण,आकर्षक फुलझाडांची लागवड, कारंज्याची दुरुस्ती,कमळ तलावाची पुनर्निर्मिती तसेच नियमित देखभालीची व्यवस्था करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.एकेकाळी मंदिराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि भाविकांना प्रसन्नतेचा अनुभव देणारा हा बगीचा पुन्हा पूर्वीप्रमाणे बहरणार का? की त्याची दुर्दशा अशीच कायम राहणार,असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.
