अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
दरवर्षी १७ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय अपस्मार दिन’ म्हणून पाळला जातो. ‘एपिलेप्सी फाउंडेशन ऑफ इंडिया’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या या दिवसाचा मुख्य उद्देश समाजातील या आजाराबद्दलची भीती, गैरसमज आणि कलंक दूर करणे हा आहे. आज आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत, विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे;
मात्र तरीही आपल्या ग्रामीण आणि शहरी भागात अनेकजण अपस्माराकडे अंधश्रद्धेच्या नजरेतून पाहतात. अंगात येणे, भूतबाधा किंवा दैवी प्रकोप समजून रुग्णाला डॉक्टरांऐवजी मांत्रिक किंवा बुवाबाबांकडे नेले जाते. या अज्ञानामुळे उपचारांना उशीर होतो आणि अनेकदा ते रुग्णाच्या जीवावर बेतू शकते.अपस्मार म्हणजे नेमके काय, हे सर्वप्रथम समजून घेणे आवश्यक आहे. अपस्मार किंवा ‘मिरगी’ हा कोणताही मानसिक किंवा वेडेपणाचा आजार नाही. हा मेंदूशी संबंधित एक सामान्य मज्जासंस्थेचा (न्यूरोलॉजिकल) विकार आहे. आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी पेशी असतात, ज्या सूक्ष्म विद्युत लहरींच्या माध्यमातून शरीराचे नियंत्रण करत असतात. या पेशींच्या विद्युत प्रवाहात अचानक आणि अनियंत्रित बिघाड झाल्यामुळे व्यक्तीला झटके येतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे ५ कोटींहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत, त्यातील सुमारे १ कोटी रुग्ण एकट्या भारतात आहेत. यावरून या समस्येची व्यापकता लक्षात येते.

( स्मिता ठाकरे लेखिका यांचा फोटो)
प्रत्येक रुग्णामध्ये अपस्माराची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. सर्वसाधारणपणे झटका आल्यावर व्यक्तीला अचानक भोवळ येऊन ती जमिनीवर कोसळते, हात-पाय आखडतात किंवा जोराने थरथरतात, दातखिळी बसते आणि तोंडातून फेस येतो. मात्र, सर्वच झटके असे तीव्र नसतात. अनेकदा लहान मुलांमध्ये काही सेकंदांसाठी शून्यात एकटक पाहणे, अचानक हातातील वस्तू गळून पडणे किंवा पापण्यांची वेगाने उघडझाप होणे ही देखील अपस्माराची लक्षणे असू शकतात. पालक किंवा शिक्षकांचे याकडे दुर्लक्ष होते आणि मुलगा अभ्यासात लक्ष देत नाही, असा गैरसमज होतो. डोक्याला झालेली गंभीर दुखापत, मेंदूचा संसर्ग, जन्माच्या वेळी बाळाच्या मेंदूला ऑक्सिजन कमी पडणे, मेंदूतील गाठ किंवा आनुवंशिकता ही या आजारामागची मुख्य कारणे आहेत.आपल्या समाजात या आजाराबाबत अनेक चुकीचे आणि धोकादायक समज प्रचलित आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपस्मार हा संसर्गजन्य आजार नाही; तो स्पर्शाने किंवा रुग्णाच्या सहवासात राहिल्याने पसरत नाही. झटका आल्यावर रुग्णाच्या हातात लोखंडी वस्तू किंवा चावी देणे, नाकाजवळ कांदा किंवा घाणेरडी चप्पल धरणे हे प्रकार अत्यंत चुकीचे आणि अमानवी आहेत. झटका हा मेंदूतील प्रक्रियेमुळे येतो आणि तो काही सेकंदांत किंवा मिनिटांत आपोआप थांबतो; तो कांदा किंवा चपलेच्या वासाने थांबत नाही. तसेच, झटका आल्यावर रुग्णाच्या तोंडात चमचा, बोट किंवा पाणी घालण्याचा प्रयत्न कधीही करू नये. दातखिळी बसलेली असताना जबरदस्तीने तोंड उघडण्याचा प्रयत्न केल्यास रुग्णाचे दात तुटू शकतात, जिभेला गंभीर इजा होऊ शकते किंवा पाणी फुफ्फुसात जाऊन श्वास गुदमरण्याचा धोका असतो.कोणत्याही व्यक्तीला अचानक झटका आल्यास आजूबाजूच्या लोकांनी घाबरून न जाता शांत राहणे अत्यंत गरजेचे असते. अशा वेळी रुग्णाला सुरक्षित आणि सपाट जागी झोपवावे आणि त्याच्या आजूबाजूच्या टोकदार, कठीण किंवा गरम वस्तू तात्काळ बाजूला कराव्यात, जेणेकरून त्याला इजा होणार नाही. रुग्णाच्या डोक्याखाली मऊ उशी किंवा घडी केलेला कपडा ठेवावा आणि त्याला हळुवारपणे एका कुशीवर वळवावे. असे केल्याने तोंडातील लाळ किंवा फेस श्वासनलिकेत अडकणार नाही. रुग्णाच्या गळ्याभोवतीचे कपडे सैल करावेत आणि त्याच्याभोवती गर्दी न करता मोकळी हवा येऊ द्यावी. झटका पूर्णपणे थांबल्याशिवाय रुग्णाला काहीही खाण्यास किंवा पिण्यास देऊ नये. जर झटका पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकला, रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा एकापाठोपाठ एक झटके येत राहिले, तर विलंब न करता रुग्णाला जवळच्या रुग्णालयात दाखल करावे.आज वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या संशोधनामुळे अपस्मारावर अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित औषधे उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार घेतल्यास, पुरेशी झोप आणि ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन केल्यास सुमारे सत्तर टक्के रुग्ण झटक्यांपासून पूर्णपणे मुक्त होतात. उरलेल्या रुग्णांमध्येही योग्य उपचार किंवा शस्त्रक्रियेद्वारे झटक्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करता येते. अपस्मार असलेली व्यक्ती इतरांप्रमाणेच उच्च शिक्षण घेऊ शकते, नोकरी-व्यवसाय करू शकते, खेळात प्राविण्य मिळवू शकते आणि सुखी वैवाहिक जीवन जगू शकते. केवळ समाज काय म्हणेल या भीतीने आजार लपवून ठेवणे किंवा लग्नानंतर आजार बरा होईल या आशेवर राहणे अत्यंत चुकीचे आहे.राष्ट्रीय अपस्मार दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प करूया. या रुग्णांकडे दयाळू किंवा कमकुवत नजरेने न पाहता, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सामावून घेऊया. कुटुंबाचा भक्कम आधार, वेळेवर वैद्यकीय उपचार आणि समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन मिळाल्यास अपस्मारग्रस्त व्यक्ती नक्कीच उंच भरारी घेऊ शकते. गैरसमज बाजूला सारून विज्ञानाची कास धरणे, हीच या दिवसाची खरी फलश्रुती ठरेल.
—–स्मिता ठाकरे.अमरावती
