दीड महिन्यापासून हजारो लिटर पाणी वाया
गळतीमुळे शेती धोक्यात; कारवाईची ग्रामस्थांची मागणी
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
पहूर गावातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये तसेच परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने बेंबळा नदीवर बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या बंधाऱ्याच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामात संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
गेल्या एक ते दीड महिन्यापासून बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून, पाणी साठवून ठेवण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे, यावर्षी पाण्याची उपलब्धता कमी असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. पाण्याची नासाडी रोखावी, जलसाठ्यांमधील गळती तातडीने बंद करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले असतानाही पहूर येथील बंधाऱ्याच्या बाबतीत या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी पत्रे अथवा प्लेट टाकण्याचे काम करण्यात आले. मात्र, हे काम करण्यापूर्वी जुन्या पत्र्यांची योग्य तपासणी करून त्यांची आवश्यक दुरुस्ती करणे अपेक्षित होते. गंजलेले, फुटलेले आणि ठिकठिकाणी छिद्रे पडलेले पत्रे दुरुस्त करूनच बसविणे गरजेचे होते. परंतु, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांनी याकडे दुर्लक्ष करून खराब अवस्थेतील पत्रे जशीच्या तशी टाकल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. परिणामी, बंधाऱ्यात पाणी अडविण्याऐवजी ते मोठ्या प्रमाणात बाहेर वाहून जात आहे.गेल्या एक ते दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. बंधाऱ्यात अपेक्षित पाणीसाठा टिकून राहत नसल्याने परिसरातील शेतीसाठी होणारा पाणीपुरवठाही प्रभावित झाला आहे. आधीच पाण्याची कमतरता असताना उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याऐवजी अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पाणी वेळेवर उपलब्ध न झाल्यास उभी पिके सुकण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.यासंदर्भात संकेत ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, “शासनानेच आम्हाला हे दिवस पाहायला लावले आहेत. बंधाऱ्यातील गळती वेळीच थांबविली असती तर आज हजारो लिटर पाणी वाया गेले नसते. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर पुढील महिन्यात पहूर गावातील नागरिकांसह शेतकऱ्यांनाही मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.”अनिल शेंडे, गोवर्धन शेंडे यांच्यासह ग्रामस्थांनीही संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामात योग्य दक्षता घेतली असती, तर आज पाण्याची एवढी मोठी नासाडी झाली नसती. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गावाचे पाणी वाया जात असून, त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या पिकांवर होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
गळती तातडीने थांबविण्याची मागणी
प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन बेंबळा नदीवरील पहूर बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी करावी, गळती होत असलेल्या ठिकाणांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि पाण्याची नासाडी त्वरित थांबवावी, अशी मागणी होत आहे. तसेच दुरुस्तीच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराची आणि जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. पाणीटंचाईचे संकट ओढवण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे आणि उपलब्ध जलसाठा टिकविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संकेत ठाकरे, आकाश खडसे, यश मारबडे, अनिल शेंडे, गोवर्धन शेंडे यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी केली आहे.
