•टाळ-मृदंगाचा गजर,धार्मिक गायन आणि विविध देखाव्यांनी दुर्गादेवीची मिरवणूक उत्साहात;
अंजनगाव बारी नगरी दुमदुमली!
अंजनगाव बारी ( पवन इंगोले )
दि.२४ सध्याच्या डीजे आणि कर्णकर्कश आवाजाच्या गोंगाटाला फाटा देत वीर भगतसिंग दुर्गोत्सव मंडळाने यंदा श्री संत गजानन महाराज वारकरी दिंडी, सोनोरी (ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) येथील सुमारे ६० वारकऱ्यांच्या सहभागातून पारंपरिक पद्धतीने दुर्गादेवीची भव्य मिरवणूक काढली.

टाळ-मृदंगाचा गजर, धार्मिक गायन, कालिका देवीची झाकी, पवनसुत हनुमानासह विविध देखावे, नृत्य आणि पथनाट्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वारकरी दिंडीच्या भक्तिमय वातावरणामुळे अंजनगाव बारीत जणू पंढरी अवतरल्याची अनुभूती आली.

या मिरवणुकीत गावातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी वीर भगतसिंग दुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व युवकांनी परिश्रम घेतले.पारंपरिक वारकरी संस्कृतीचा जागर करत ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सवाचा संदेश देणारी ही मिरवणूक नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरली.
