अडीचशे वर्षांची परंपरा; भाविकांच्या पुढाकारातून मंदिराचा विकास, नवरात्रोत्सवात हजारो भाविकांची उपस्थिती
अंजनगाव बारी /पवन इंगोले
अंजनगाव बारी ते पार्डी (देवी) मार्गावर वसलेले तेलाई माता मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. परिसरापासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर असलेल्या या देवस्थानाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभले आहे. सुमारे अडीचशे वर्षांपासून वडाच्या झाडाखाली विराजमान असलेल्या तेलाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांची वर्षभर वर्दळ असते.
भाविकांच्या पुढाकारातून गेल्या पाच वर्षांत या ठिकाणी मंदिराची भव्य वास्तू उभारण्यात आली. तेलाई माता साक्षात अवतार असल्याची भाविकांची श्रद्धा असून, देवीच्या आशीर्वादाने मनोकामना पूर्ण होत असल्याची भावना अनेक भाविक व्यक्त करतात. अंजनगाव बारीच्या चारही दिशांना तेलाई माता, मातामाय, मरामाय आणि भवानी माता या देवींचे वास्तव्य असल्याची स्थानिक भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिर परिसरात शेतशिवार असल्याने अनेक शेतकऱ्यांना स्वप्नात देवीने आपल्या वास्तव्याची जाणीव करून दिल्याचे सांगितले जाते. भाविकांच्या श्रद्धेतून आणि सामूहिक प्रयत्नांतून मंदिराचा विकास झाला असून, येथे भव्य सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे धार्मिक कार्यक्रम, भजन आणि विविध उपक्रमांसाठी हे देवस्थान महत्त्वाचे केंद्र बनले आहे.नवरात्रोत्सवात मंदिर परिसरात आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात येते. परिसरातील सुमारे २२ गावांतील भाविक नवरात्रोत्सवाच्या काळात तेलाई मातेच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. वाढत्या भाविकांच्या सहभागामुळे या देवस्थानाचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे.तेलाई माता मंदिर, अंजनगाव बारी-पार्डी रोड येथे सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी महाप्रसाद (भंडारा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी पारी १२ वाजल्यापासून भाविकांच्या आगमनापर्यंत हा स्नेहकार्यक्रम सुरू राहिला.या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी सहकुटुंब व सहपरिवार उपस्थित राहून लाभ घेतला या कार्यक्रमाला तेलाई माता मंदिर व्यवस्थापनाच्या व गावातील युवक वर्गांचे सहकार्य लाभले.
