सावंगा विठोबा येथे अडीच वर्षांपासून मोफत रोगनिदान व औषधोपचार;
कलाजीवन धर्मार्थ रुग्णालयाच्या माध्यमातून अखंड आरोग्यसेवा
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील तालुक्यातील सावंगा विठोबा हे श्रीकृष्ण अवधूत महाराजांच्या पावन वास्तव्याने आणि प्रसिद्ध कापुराच्या यात्रेमुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले तीर्थक्षेत्र आहे. परंतु गावात ना दवाखाना, ना मेडिकल, रुग्णांना उपचाराकरीता तालुक्याच्या ठिकाणी चांदुर येथे अथवा बाजूच्या मालखेड ला जावे लागते,
परंतु या अवधूत नगरीत येणाऱ्या भाविकांसह स्थानिक नागरिकांना आरोग्यसेवेचा आधार मिळावा, या उदात्त हेतूने डॉक्टर बडघरे दाम्पत्याने सुरू केलेला सेवाभावी उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.अवधुती संप्रदायाशी नाळ जोडलेले आणि अवधूत महाराजांचे निस्सीम भक्त असलेले अवधूतवासी जगजीवनजी बडघरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र वरूड येथील डॉ. अरविंद ज. बडघरे व सून डॉ. रेखा अरविंद बडघरे यांनी ‘कलाजीवन धर्मार्थ रुग्णालय’ या माध्यमातून सावंगा विठोबा येथे मागील अडीच वर्षांपासून विनामूल्य आरोग्यसेवेचा वसा जपला आहे.या धर्मार्थ रुग्णालयाच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सावंगा विठोबा येथील नागरिक तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. यासोबतच आवश्यक औषधांचे विनामूल्य वितरणही केले जाते. विशेष म्हणजे, कोणताही आर्थिक मोबदला न घेता हा आरोग्यसेवेचा उपक्रम गेल्या अडीच वर्षांपासून सातत्याने सुरू आहे.सावंगा विठोबा येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. विशेषतः यात्रा व धार्मिक उत्सवांच्या काळात हजारो भाविक या तीर्थक्षेत्री दाखल होतात. अशा परिस्थितीत मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिकांसह बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांनाही मोठा दिलासा मिळत आहे.
“स्मृतींचे रूपांतर सेवेत आणि सेवेतून समाधानाचा आनंद अशा या उपक्रमातून डॉक्टर बडघरे दाम्पत्याने वडिलांच्या स्मृतींना अनोख्या पद्धतीने अभिवादन करत समाजासमोर सेवाभावाचा आदर्श निर्माण केला आहे.आई-वडिलांच्या स्मृती जपण्याचे अनेक मार्ग असतात; मात्र त्यांच्या स्मृतींना समाजसेवेची जोड देत गरजू रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणे, हा डॉक्टर बडघरे दाम्पत्याचा उपक्रम खऱ्या अर्थाने समाजाप्रती असलेल्या कर्तव्यभावनेचे दर्शन घडविणारा आहे. त्यांच्या या कार्याचे सावंगा विठोबा परिसरातील नागरिक व भाविकांकडून कौतुक होत आहे.”
-पुंजाराम नेमाडे, अध्यक्ष, श्री विठोबा संस्थान, सावंगा विठोबा.
