सालोड, पापड, पिंपळगाव निपाणीसह परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.
नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि नागरिकांच्या दळणवळणाची अडचण लक्षात घेऊन खेड पिंपरी येथील तडफदार युवा सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांनी पाठपुरावा केलेल्या ‘अमरावती ते नेर’ (खेड पिंपरी मार्गे) बस सेवेला अखेर यश आले आहे.
विभागीय वाहतूक परिवहन विभाग, अमरावती (DTO रॉयलवार) यांच्याकडे केलेल्या निवेदनानंतर दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी बडनेरा बस डेपोकडून ही बस सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली.भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावावरून जाणारी ही बस खेड पिंपरी, पिंपळगाव निपाणी, सालोड, मंगरूळ चव्हाळ, शिंगणापूर आणि वटफळी मार्गाने धावणार आहे. या सेवेमुळे अमरावती आणि यवतमाळ हे दोन जिल्हे थेट जोडले गेल्याने स्थानिक शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना बाजारपेठ व शिक्षणासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

सरपंच मंगेश कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस दररोज सकाळी नेर येथून ८:०० वाजता व सालोड येथे 8: 30 मिनिटांनी निघून ९:०० वाजता खेड पिंपरी येथे पोहोचेल आणि १०:३० वाजता अमरावती गाठेल. तर परतीच्या प्रवासात अमरावतीवरून संध्याकाळी ४:०० वाजता निघून ५:०० वाजता पापड येथे पोहोचणार आहे सालोड येथे स्वागत: सालोड येथे बसचे आगमन होताच प्रकाश वेळूकर, अंकुश निमनेकर, चेतन राऊत, प्रफुल ठाकरे, अनिल ढोमणे, दिनेश सावदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांच्या वतीने बसचे पूजन करून चालक रवींद्र कडू यांचा सन्मान करण्यात आला. पिंपळगाव निपाणी येथे ओंकार देवकते व ग्रामस्थांनी बसचे स्वागत केले, तर पापड येथे सरपंच इंगळे यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी बसचे भव्य पूजन करून स्वागत केले. खेड पिंपरी येथे सरपंच, ग्रामस्थ, महिला आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात बसचे स्वागत केले. चालक रवींद्र कडू यांचा शाल व श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
