खंडेश्वर संस्थानकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष?
दर्जा मिळूनही अपेक्षित सुविधा अद्याप अपुऱ्या |
विकासकामांना गती देण्याची भाविक व नागरिकांची मागणी.
नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
संपूर्ण तालुका वासियांचे आराध्य दैवत असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील खंडेश्वर संस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला असतानाही मंदिर परिसराचा अपेक्षित विकास अद्याप झालेला नसल्याची भावना भाविक व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तीर्थक्षेत्राच्या दर्जामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात मूलभूत सुविधा आणि पायाभूत विकासाच्या बाबतीत अद्याप मोठी कामे होणे बाकी आहे.
अत्यंत जागृत असलेल्या खंडेश्वर संस्थानला धार्मिक आणि स्थानिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. महाशिवरात्रीसह श्रावण महिन्यात विविध सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांच्या काळात येथे भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे मंदिर परिसरातील रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रकाशव्यवस्था, पार्किंग तसेच भाविकांसाठी आवश्यक अन्य सुविधांचा नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे आहे. या मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर शासनाकडून कोणती विकासकामे मंजूर झाली त्यासाठी किती निधी उपलब्ध झाला आणि त्यापैकी किती कामे पूर्ण झाली, याबाबत स्पष्ट माहिती नागरिकांसमोर येणे आवश्यक आहे.मात्र ती माहिती कुणीही द्यायला तयार नाहीत. मंदिर विकासकामांचा प्रस्ताव, मंजूर निधी आणि प्रत्यक्ष झालेली कामे याबाबत संबंधित प्रशासनाने माहिती जाहीर केल्यास या विषयावरील संभ्रम दूर होण्यास मदत होऊ शकते.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा
खंडेश्वर संस्थानच्या विकासासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. विविध प्रसंगी संस्थानला भेट देताना विकासाबाबत फक्त आश्वासने दिली जात असल्याचे नागरिक सांगतात मात्र त्यानंतर प्रत्यक्षात कोणती कामे मार्गी लागली, याबाबत समाधानकारक माहिती उपलब्ध नसल्याची त्यांची तक्रार आहे.धार्मिक स्थळाचा विकास हा केवळ मंदिरापुरता मर्यादित विषय नसून त्याचा स्थानिक पर्यटन, रोजगार आणि व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध शासकीय योजनांचा प्रभावी वापर करून संस्थान आणि परिसराचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची गरज आहे.
विकास आराखडा आणि निधीचा लेखाजोखा स्पष्ट करण्याची मागणी
श्री खंडेश्वर संस्थानच्या विकासासाठी आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन पुढील कामांसाठी ठोस आराखडा तयार करण्याची मागणी होत आहे.मंजूर निधी, प्रलंबित प्रस्ताव आणि प्रस्तावित विकासकामांची माहिती सार्वजनिक केल्यास नागरिकांनाही विकासाच्या प्रक्रियेची दिशा स्पष्ट होईल.‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतरही अपेक्षित बदल दिसत नसल्याने या विभागातील लोकप्रतिनिधी विषयी नाराजी व्यक्त होत आहे. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या विषयाकडे किती गांभीर्याने पाहतात आणि प्रत्यक्ष विकासकामांना कधी सुरुवात होते,याकडे भाविकांसह नांदगाव खंडेश्वरवासीयांचे लक्ष लागले आहे.
