८ सप्टेंबर रोजी सिईओना घालणार घेराव !
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या सात वर्गांसाठी केवळ तीन शिक्षक कार्यरत असताना प्रशासन मात्र या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित राहणे ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.
या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य संदेश ढोके यांनी १९ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र निवेदन देऊन तब्बल २० दिवस उलटले तरी रिक्त पदावर अद्याप शिक्षकाची नियुक्ती झालेली नाही.त्यामुळे निवेदन स्वीकारणे एवढीच प्रशासनाची जबाबदारी आहे का,की त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही करणेही अपेक्षित आहे? असा आक्रमक सवाल आता उपस्थित होत आहे.या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेता ८ सप्टेंबर २०२६ रोजी संदेश ढोके हे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांसह CEO यांच्या दालनासमोर ठिय्या देऊन सीईओ यांना घेराव घालणार आहे. एक शिक्षक सेवानिवृत्त झाला; पण त्याच्या जागेवर शिक्षक का नाही? शाळेत यापूर्वी चार शिक्षक कार्यरत होते.मात्र शिक्षक लळे सर ३० जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर अद्याप पर्यायी शिक्षक देण्यात आलेला नाही.सध्या मुख्याध्यापक सौ.ज्योती गावनेर यांच्यासह केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत.मुख्याध्यापकांवर प्रशासकीय कामकाज, बैठका, अहवाल आणि इतर शासकीय जबाबदाऱ्या असल्याने प्रत्यक्ष अध्यापनाचा मोठा भार उर्वरित शिक्षकांवर येत आहे. सात वर्ग आणि अपुरे शिक्षक ही केवळ प्रशासकीय आकडेवारी नसून त्यामागे शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि भवितव्याचा प्रश्न आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तर याला जबाबदार कोण? शिक्षकांची कमतरता कायम राहिल्यास अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीतही शिक्षकांची कमतरता दूर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी CEO यांना निवेदन देण्यात आले. तरीही आजपर्यंत नियुक्तीचा आदेश निघत नसेल, तर प्रशासनाच्या कार्यवाहीची गती नेमकी किती आहे? असा प्रश्न निर्माण होतो.निवेदनांच्या ढिगाऱ्यात विद्यार्थ्यांचे भविष्य हरवणार का? असा संतप्त सवाल संदेश ढोके यांनी उपस्थित केला.या प्रकरणाकडे केवळ एका गावातील शाळेचा प्रश्न म्हणून पाहता येणार नाही. ग्रामीण भागातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि पुरेसे शिक्षक मिळणे हा त्यांच्या शैक्षणिक हक्क आहे.सात वर्गांसाठी अपुरे शिक्षक असताना रिक्त पदावर तातडीने नियुक्ती का करण्यात आली नाही? १९ ऑगस्टचे निवेदन प्रशासनाकडे पोहोचल्यानंतर त्यावर कोणती कार्यवाही झाली? कायमस्वरूपी नियुक्ती शक्य नसेल तर तात्पुरती शिक्षक व्यवस्था का करण्यात आली नाही.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत कोणती ठोस पावले उचलली?या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने देणे गरजेचे आहे. कारण हा केवळ शिक्षकांचा प्रश्न नाही; हा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
